धामणे दाम्पत्याचे मनोगत : प्रकट मुलाखतीतून उलगडला जीवनप्रवासनागपूर : लग्नानंतर कार्यालयात जाताना एक मनोरुग्ण उकिरड्यावर विष्ठा खाताना दिसला. ते पाहून मन सुन्न झाले. मनोरुग्ण महिलांवरही होणारे अत्याचार डोळ्यापुढे आले. त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची खूणगाठ मनाशी बांधली. त्यांचे पुनर्वसन करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परंतु आपल्यातील ऊर्जेचा सकारात्मक वापर केल्यास कुठल्याही समस्येवर मात करता येते, असे मनोगत अहमदनगरमधील शिंगवे नाईक येथील माऊली सेवा प्रतिष्ठानचे डॉ. राजेंद्र आणि डॉ. सुचेता धामणे यांनी आज येथे केले.प्रयास सेवांकुर, मुंडले एज्युकेशन ट्रस्ट आणि स्व. अच्युतराव महाजन चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने ‘आम्ही बिघडलो...तुम्ही बी घडाना’ या कार्यक्रमात अविनाश सावजी यांनी डॉ. राजेंद्र आणि डॉ. सुचेता धामणे यांची प्रकट मुलाखत घेतली. डॉ. राजेंद्र धामणे म्हणाले, आईवडिल शिक्षक होते. आईला गरिबांची कळकळ होती. हृदयविकाराने तिचा मृत्यू झाला. पदवीनंतर आईच्या स्मरणार्थ माऊली संस्था सुरू केली. सुचेताशी लग्न झाले. ती मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक, मी डॉक्टर असल्यामुळे प्रॅक्टीस सुरू केली. एका दिवशी एका मनोरुग्णाला भूक लागल्यामुळे तो विष्ठा खाताना दिसला. तेंव्हापासून अन्नपूर्णा प्रकल्प सुरू केला. दररोज अन्नाची ५० पाकिटे तयार करून ती मनोरुग्णांना द्यायचो. त्यांना हक्काचे घर देण्याचा विचार मनात आला. वडिलांनी संस्थेला प्लॉट दिला. पहिली मनोरुग्ण आक्काला घरी आणले. परंतु आजारपणामुळे आक्काचा मृत्यू झाला. जवळच्या मित्रांनी तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिला. पुण्याचे साने यांनी ६ लाखाची मदत केली. चांगली माणसे भेटत गेली. सध्या संस्थेत ६० मनोरुग्ण महिला, १० मुले आहेत. मनोरुग्ण चांगले झाले तरी त्यांचे कुटुंबीय त्यांचा स्वीकार करीत नसल्याने भविष्यात त्यांना अखेरच्या क्षणापर्यंत संस्थेत ठेवण्याचा आणि संस्थेच्या कार्याची व्याप्ती वाढवून महाराष्ट्रात एकही मनोरुग्ण रस्त्यावर दिसणार नाही याची व्यवस्था करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.डॉ. सुचेता धामणे यांनी कुटुंबात अनेकदा भांडण झाले. परंतु सामाजिक कार्य करताना कधीच मतभेद झाले नसल्याचे सांगितले. धामणे दाम्पत्याचा दहावीला असलेला मुलगा पंकज याने मानसोपचार तज्ज्ञ होऊन संस्थेत सेवा देण्याचा मानस व्यक्त केला. अविनाश सावजी यांनी हसतखेळत मुलाखतीत रंग भरला. (प्रतिनिधी)
समस्येवर सकारात्मक ऊर्जेचे औषध
By admin | Published: January 19, 2015 12:49 AM