ऑनलाइन लोकमत
देवणी : देवणी तालुक्यातील कवठाळा आणि जवळगा येथे क्षयरोगा संदर्भात आपण उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी आहोत, अशी बतावणी करीत रुग्णांची फसवणूक करणाऱ्या कोल्हापूरच्या एका तोतया वैद्यकीय अधिकाऱ्याला शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी देवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना भेटून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवत रुग्णांना लुबाडणारा तोतया वैद्यकीय अधिकारी प्रवीण बापूजी कुलकर्णी (रा. राधा नगरी, जिल्हा कोल्हापूर) याला पोलिसांनी शुक्रवारी जवळगा येथून ताब्यात घेतले आहे. आपण लातूरला जिल्हा आरोग्य खात्यात डॉक्टर असून, आपणास २० ते २५ हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळवून देतो, असे क्षयरोग आणि एड्सग्रस्त रुग्णांना गाठून तो बतावणी करीत असे. या बदल्यात रुग्ण व नातेवाईकांकडून काही रक्कम उकळण्याचा प्रकार त्याने देवणी तालुक्यातील वलांडी, धनेगाव, जवळगा, विळेगाव आदी गावच्या परिसरात केल्याचे पुढे आले आहे. कुलकर्णी हा २० जुलै रोजी विळेगाव येथील बालाजी महादेव रावजी यांना आर्थिक मदत मिळवून देण्याच्या नावाखाली काही हजारांना गंडा घातला. यानंतर शुक्रवारी जवळगा भागात फिरत असताना त्याने एका आशा कार्यकर्तीला लुबाडण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात आशा कार्यकर्तीने आपल्या वरिष्ठांशी संपर्क साधून याबाबत अधिक विचारणा केली असता या तोतया वैद्यकीय अधिकाऱ्याचे बिंग फुटले. त्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यास पकडून देवणी पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी बालाजी रावजी यांनी फिर्याद दिली असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देवणी पोलिस ठाण्यात सुरू आहे.