- सोपान पांढरीपांडे, नागपूर
आफ्रिकेतील तांझानिया, केनिया आणि मोझांबिकमधून तूर डाळीची आयात सुरू झाल्यामुळे दोन महिन्यांत तूरडाळीचे भाव घसरण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी तूरडाळीचा तुटवडा ११ दशलक्ष टनावर गेल्यामुळे किलोमागे भाव २०० रुपये झाले होते. त्यानंतर केंद्र व राज्य सरकारने साठेबाजांवर कारवाई करत बफर स्टॉक खुला केला होता. राज्य सरकारने तर डाळींचे भाव नियंत्रण अधिसूचनाही जारी केली. परिणामी भाव कमी होऊन ते सध्या १७० रुपये किलोवर आले.गेल्या वर्षी ९.७६ दशलक्ष हेक्टरमध्ये तुरीचा पेरा यावर्षी वाढून १०.४९ द.ल. हेक्टर झाला. यंदा तुरीचे उत्पादनही वाढून १८.५० द.ल. टन झाले. याच काळात तूरडाळीची मागणी २८ द.ल. टनावरून २४.५० द.ल. टनावर आली आहे. परिणामी ६ दशलक्ष टन तुरीचा तुटवडा निर्माण झाला आहे. उपरोक्त तूर आयात करावी लागणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तुरीची उपलब्धता वाढली आहे व आफ्रिकन देशातून आयात सुरू झाली आहे. या तुरीचा भाव ७० रु. किलो पडतो व प्रक्रियेनंतर डाळमिल कंपन्यांना तूरडाळीचा भाव ९५ ते १०५ रु. किलो पडेल. किरकोळ दुकानांमध्ये तुरीचे भाव १३० ते १४० रु. किलो राहतील, अशी माहिती डाळमिल मालक मनोहर भोजवानी यांनी दिली.दोन महिन्यांत खुलासा- आफ्रिकेतील हंगाम संपल्यानंतर ब्रम्हदेश, थायलंडमधील तूर भारतात येणे सुरू होईल व त्यामुळे उपलब्धता वाढून भाव कमी होण्यास मदत होईल. आफ्रिकन तुरीपासून बनलेली तूरडाळ बाजारात येण्यास दोन महिने लागतील व तोपर्यंत भाव वाढलेलेच राहतील, असा खुलासाही भोजवानी यांनी केला.