शफी पठाण। लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होण्याच्या शक्यतेला बळ मिळाले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची या वर्षीची पहिली बैठक रविवारी नागपुरात महामंडळाच्या कार्यालयात पार पडली. महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या अध्यक्षेत पार पडलेल्या या बैठकीत स्थळ निवड समिती गठित करण्यात आली. समितीतील सदस्य संमेलनाच्या यजमानपदाचा मान दिल्लीला देण्याबाबत अनुकूल असून तशी अधिकृत घोषणा महामंडळाच्या सप्टेंबरमध्ये होणाऱ्या बैठकीत केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.दिल्लीत मराठी साहित्य संमेलन होणे, हे दिल्लीतील तमाम मराठी जनांसाठी अभिमानाचा विषय आहे, असे नमूद करीत ९१ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन दिल्लीतच व्हावे, असा प्रस्ताव दिल्ली मराठी प्रतिष्ठानने महामंडळाकडे पाठवला आहे. ६४ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर हे संमेलन दिल्लीत होणार असेल, तर त्याला देशभरातून साहित्यिक व साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.या सर्व बाबी लक्षात घेता स्वत: अध्यक्षांसह निवड समितीचे सदस्य दिल्लीबाबत अनुकूल असल्याची माहिती आहे. तरीही बडोदे, पुणे, तळोधी बाळापूर (चंद्रपूर), हिवरा आश्रम (बुलडाणा)अशा एकूण सहा ठिकाणांहून प्रस्ताव आल्याने महामंडळाच्या संकेतानुसार, यातील किमान तीन ठिकाणी भेटी देण्यात येणार आहेत.
९१ वे मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होण्याची शक्यता
By admin | Published: June 05, 2017 4:36 AM