मुंबई : आॅन ड्युटी २४ तास राबणाऱ्या एसआरपीएफ जवानांच्या साप्ताहिक सुटीबाबतच्या संघर्षाला ‘लोकमत’मध्ये वाचा फोडताच प्रशासनाने त्याची दखल घेतली. जवानांच्या साप्ताहिक सुटीच्या अहवालाबरोबरच त्यातील अटी शिथील करण्याच्या प्रयत्नांसाठी १६ गटांतील समादेशकांचे अभिप्राय मागविण्यात आले आहेत. राज्य राखीव पोलीस दलाचे अप्पर पोलीस महासंचालक विजयसिंह जाधव यांनी हे आदेश दिले आहेत.आपत्कालीन परिस्थिती, वेळोवेळी राज्यात ठेवण्यात येणारा बंदोबस्त, मोर्चे, सण सुरक्षेसाठी एसआरपीएएफचे जवान आॅन ड्युटी २४ तास राबतात. राज्यातील पुणे, जालना, नागपूर, दौंड, धुळे, अमरावती, सोलापूर आणि मुंबई येथील १६ गटांमध्ये त्यांचे कामकाज चालते. तर यात आयआरबीचे (भारतीय राखीव बटालियन) तीन गट आहेत. जवळपास १५ हजाराचा फौजफाटा असलेल्या या जवानांना आॅन ड्युटी २४ तास काम करून देखील साप्ताहिक सुट्टीसाठी झगडावे लागते. याबाबत ‘जवानांची छळछावणी’द्वारे ‘लोकमत’मध्ये २४ एप्रिल रोजी वाचा फोडण्यात आली. या वृत्ताची दखल घेताच मंगळवारी राज्य राखीव पोलीस दलाचे अप्पर पोलीस महासंचालक विजयसिंह जाधव यांनी १६ गटांतील समादेशकांना याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.साप्ताहीक सुटी सायंकाळी ५ पासून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ पर्यंत घेण्याची परवानगी असते. जवानांकडून साप्ताहिक सुटीबाबत सायंकाळी ५ वाजल्यापासून तिसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हजर राहण्याची परवानगी देण्याबाबत मागणी करण्यात आली होती.
जवानांच्या साप्ताहिक सुटीत वाढ होण्याची शक्यता
By admin | Published: April 28, 2016 2:32 AM