मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचे दिलेले संकेत, नवरात्रीतच सीमोल्लंघन करण्याचे काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केलेले सूतोवाच, या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मातोश्रीवर मंत्री आणि आमदारांची बैठक बोलाविली असून, ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे.शिवसेना आमदारांनी या पूर्वीही सेनेच्या मंत्र्यांविरोधातील नाराजी बोलून दाखविली होती. हे मंत्री आपल्याच आमदारांची कामे करीत नाहीत. त्यांच्या दालनात अपमानास्पद वागणूक मिळते, अशी तक्रार आमदारांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यासमोरच केली होती. यावर योग्य वेळी निर्णय घेण्याचे आश्वासन उद्धव यांनी त्यावेळी दिले होते.संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग आला असता, शिवसेनेतही खांदेपालट होण्याची शक्यता आहे. विधानसभा आमदारांच्या वाट्याला मंत्रिपद येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या मंत्रिपदांपैकी चार जण विधानपरिषदेचे सदस्य आहेत. जनतेतून निवडून आलेल्यांना संधी मिळणार की नाही, असा सवालही आमदारांनी यापूर्वी केला होता. याचीच पुनरावृत्ती सोमवारच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे.>इंधन दरवाढीविरोधात आंदोलनपेट्रोल, डिझेल आणि घरगुती सिलिंडरच्या सतत वाढणाºया दरवाढीचा निषेध करण्यासाठी, नवरात्रीच्या काळात भाजपाविरोधात शिवसेना महामोर्चा काढणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेच्या महिला आघाडीकडे असेल. रविवारी शिवसेना भवनात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी पक्षाच्या महिला आघाडीची बैठक झाली.
शिवसेना आमदारांची आज बोलावलेली बैठक वादळी ठरण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 6:16 AM