लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : राज्यात विधानसभेची मध्यावधी निवडणूक कधीही लागू शकते. त्यादृष्टिने कामाला लागण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केल्याची माहिती माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.नाशिकहून जळगावकडे जाताना खडसे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. कदाचित, दोन वर्षानंतर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसोबत किंवा शक्य झाले तर, येत्या डिसेंबरमध्येही निवडणूक होऊ शकते. भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत स्वत: मुख्यमंत्र्यांनीच ही माहिती दिल्याचा दावा खडसे यांनी केला.भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतील गोपनीय माहिती खडसे यांनी प्रसारमाध्यमांना कशी दिली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणात मंत्रीपद गेल्यापासून खडसे सरकारवर नाराज आहेत. विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर त्यांचा नेहमीच रोख राहिलेला आहे. जीएसटीसाठीच्या विशेष अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी विरोधकांच्या संघर्ष यात्रेत खडसे यांनी केलेल्या पाहुणचाराचा उल्लेख करताच ‘कट्टपाने बाहुबली को क्यों मारा?’ असे सूचक विधान खडसे यांनी केले होते सरकारने केलेली लोकोपयोगी कामे जनतेपर्यंत पोहोचली नसल्याने सांगत खडसे यांनी सरकारविषयीची आपली नाराजी पुन्हा व्यक्त केली. उत्तर महाराष्ट्रातील उपसा सिंचन योजनेचे काम लवकर मार्गी लागले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
राज्यात मध्यावधीची शक्यता!
By admin | Published: May 24, 2017 2:39 AM