मुंबई - विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीशी युती तोडल्यानंतर एमआयएमने आपले उमेदवार जाहीर करण्याचा धडका लावला आहे. त्याचप्रमाणे शुक्रवारी औरंगाबाद शहरातील तिन्ही उमेदवार एमआयएमकडून जाहीर करण्यात आले आहे. मात्र मध्य विधानसभा मतदार संघातून जावेद कुरैशी यांचा पत्ता कट करून माजी गटनेते तथा नगरसेवक नासेर सिद्दिकी यांना उमेदवारी दिल्याने एमआयएममध्ये बंडखोरी होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एंट्री केलेल्या एमआयएमने दोन जागांवर विजय मिळवला होता. पुढे औरंगाबाद महानगरपालिककेत सुद्धा एमआयएमला मोठ्याप्रमाणात यश मिळाले होते. त्यांनतर पक्षाची ताकद शहरात वाढताना पाहायला मिळाली. त्यातच लोकसभा निवडणुकीत सुद्धा खासदार इम्तियाज जलील यांनी माजी खासदार चंद्रकात खैरेंचा पराभव करत विजय मिळवला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून पक्षात नेत्यांनी जोरदार तयारी केली होती.
एमआयएम पक्षाला शहरात उभे करण्यात जावेद कुरैशी यांचा सिहांचा वाटा होता. तर मध्य मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून कुरैशी यांना अपेक्षा होती. मात्र ऐनवेळी त्यांचा पत्ता कट करण्यात आला असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर जावेद कुरैशी यांना पक्षाने उमेदवारी न देण्याचा निर्णय त्यांचावर अन्याय करणारा असल्याचा आरोप सुद्धा कुरैशी यांच्या समर्थकांनी केला आहे. तर त्यामुळे मध्य विधानसभा मतदारसंघातून बंडाळी होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
इम्तियाज जलील हे लोकसभेत गेल्याने मध्य मतदारसंघात उमेदवारीसाठी आपली वर्णी लागावी म्हणून अनेकजण या मतदारसंघातुन इच्छुक होते. मात्र ऐनवेळी नासेर सिद्दिकी यांना उमेदवारी जाहीर झाल्याने इच्छुकांमध्ये नाराजीची लाट पाहायला मिळत आहे. तर पश्चिममधून उमेदवारी मिळालेले अरुण बोर्डे व नासेर सिद्दिकी हे जलील यांचे समर्थक समजले जातात हे विशेष.