मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ४० हून अधिक आमदारांनी बंड केल्याने संपूर्ण शिवसेनाच संकटात सापडल्याचे दिसत आहे. आपला गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाकडून केला जात आहे. आता शिंदे गट शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरही दावा करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे यांनी, धनुष्यबाण चिन्ह हातून गेल्यास नव्या चिन्हासाठी तयार राहा, असे आवाहन शिवसैनिकांना केले आहे. यातच "जब "खोने"के लिए कुछ भी ना बचा हो तो "पाने" के लिए बहुत कुछ होता हैं!. जय महाराष्ट्र !." असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. त्यांच्या या ट्विटचा नेमका अर्थ काय, यावर राजकीय वर्तुळात जबरदस्त चर्चा सुरू झाली आहे.
खरे तर, राऊतांच्या या ट्विटमुळे, न्यायालयीन लढाईत धनुष्यबाण चिन्ह आपल्या हातून जाऊ शकते, अशी जाणीव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तथा संजय राऊत यांना झाली आहे का? असा प्रश्नही निर्माण झाला आहे. कारण, विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आवाहन केले आहे, की "एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह केलेले बंड आणि त्या प्रक्रियेला न्यायालयीन पातळीवर मिळालेली साथ विचारात घेता, आता शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्हही काढून घेण्याचा प्रयत्न होईल. आपण कायद्याने जो लढा द्यायचा तो देऊ, मात्र, दुर्दैवाने या कायदेशीर लढाईत अपयश आलेच, तर गाफील न राहता शिवसेनेला जे काही नवे चिन्ह मिळेल. ते कमी कालावधीत घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा."
अजूनही वेळ गेलेली नाही..या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना, "वेळ गेलेली नाही. उद्धव ठाकरेंबाबत मी काही बोलणार नाही असं याआधीही मी स्पष्ट केलं आहे. वरिष्ठ नेत्यांशी त्यांनी संपर्क साधला तर मार्ग निघू शकतो. शेवटी वरिष्ठांच्या पातळीवर हे सगळं चालतं. उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चांगले संबंध आहेत. अमित शाह, नड्डांशी अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे. काही कारणामुळे जरी दूर गेले असतील तरी जवळ येऊ शकतात. आम्ही आता विधीमंडळात एका गटात आलेले आहोत. महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही काम करत आहोत. हे काम करत असताना सर्वांनी एका दिशेने काम करणे महत्वाचे आहे. यामुळे याबाबतचा निर्णय केवळ उद्धव ठाकरेच घेऊ शकतात. त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा एवढीच आम्ही प्रार्थना करू शकतो. याबाबतीत मी निश्चितीच आशावादी आहे", असे दिपक केसरकर यांनी एका वृत्तवाहीनीसोबत बोलताना म्हटले आहे.