मुंबई – मागील ५ महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. आझाद मैदानात कर्मचाऱ्यांचे कुटुंब ठिय्या आंदोलन करत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर न्यायालयात प्रकरण आहेत. मात्र आज संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर मोर्चा काढत चप्पला फेक करण्यात आली. अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलिसांनाही धक्का बसला.
शरद पवारांच्या निवासस्थानी आंदोलन होत असल्याचं समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही घराबाहेर पोहचले. आंदोलन सुरू असताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घराबाहेर येत आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. हात जोडून विनंती केली. मी तुमच्याशी चर्चा करण्यासाठी तयार आहे. शांत राहा असं विनवणी सुळे करत होत्या. यावेळी मोठ्या प्रमाणात आंदोलनात महिला भगिनींचा समावेश होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारनं दुर्लक्ष केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला.
यावेळी संतप्त एसटी कर्मचारी म्हणाले की, आजपर्यंत आमच्या १७० कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या ५ महिन्यापासून लोकशाहीनं आम्ही आंदोलन करतोय. चोरांच्या तिजोरीचे चाणक्य असलेले शरद पवारांचा धिक्कार करण्यासाठी आम्ही इथं आंदोलन करतोय. यापेक्षाही आम्ही तीव्र आंदोलन करू. इतकेच नाही तर १२ तारखेला १२ वाजता, बारामतीत या चोर सरकारचे १२ वाजवण्यासाठी आम्ही आंदोलन करणार असंही आंदोलकांनी टीव्ही ९ ला मुलाखत देताना म्हटलं आहे.
गुणरत्न सदावर्तेंना सोडणार नाही
शरद पवारांच्या घरी आंदोलन झाल्याचं समजताच राष्ट्रवादीचे मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनीच कर्मचाऱ्यांनाच भडकावून शरद पवारांच्या घरी हल्ला करण्यास सांगितले. अनेक कर्मचारी दारू पिऊन याठिकाणी आले होते. सदावर्तेंना आम्ही सोडणार नाही. हिंमत असेल तर त्यांनी येऊन दाखवावं असं आव्हान त्यांनी केले. आझाद मैदानावर संप चालू होता. सरकारशी बोलणी सुरू होती. कोर्टात प्रकरण आहे. कर्मचाऱ्यांना बोलण्याची संधी दिली होती. मात्र याप्रकारचा हल्ला खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांना यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. "एसटी कर्मचाऱ्यांशी मी बोलायला तयार आहे. त्यांनी शांत राहावं. मी या क्षणाला त्यांच्याशी बोलते. माझे आई, माझे वडील आणि मुलगी घरात आहे. मला त्यांना भेटून येऊ द्यात. ते सुरक्षित आहेत का याची चौकशी करुन येऊ द्यात मी लगेच तुमच्याशी बोलायला येते. पण तुम्ही शांत व्हा", असं आवाहन सुप्रिया सुळे वारंवार करत होत्या.