अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता; आणखी १४ जणांना मिळू शकते संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 08:29 AM2024-07-02T08:29:15+5:302024-07-02T08:32:27+5:30

अधिवेशन १२ जुलै रोजी संपेल. त्यानंतर दोन दिवस भाजपच्या प्रदेश कार्य समितीची बैठक पुणे येथे होणार आहे. भाजपला ६, शिंदेसेनेला ५, अजित पवार गटाला ३ मंत्रिपदे

Possibility of State Cabinet expansion after session; BJP 6, Shinde sena 5, Ajit Pawar group 3 ministerial posts | अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता; आणखी १४ जणांना मिळू शकते संधी

अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता; आणखी १४ जणांना मिळू शकते संधी

मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळ अधिवेशनानंतर होण्याची शक्यता आहे. भाजपला ६, शिंदेसेनेला ५ तर अजित पवार गटाला ३ मंत्रिपदे दिली जाऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले. 

विधानसभा निवडणुकीला चार महिने उरले असताना रिक्त १४ मंत्रिपदे भरण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अधिवेशन १२ जुलै रोजी संपेल. त्यानंतर दोन दिवस भाजपच्या प्रदेश कार्य समितीची बैठक पुणे येथे होणार आहे. त्यानंतर लगेच विस्तार केला जाईल, असे म्हटले जात आहे. भाजपने ६ जागा घ्याव्यात आणि ८ पैकी चार-चार मंत्रिपदे शिंदेसेना आणि आम्हाला द्यावीत, असा अजित पवार गटाचा आग्रह आहे. मात्र, मुख्यमंत्री शिंदे हे पाच मंत्रिपदे मिळण्यासाठी आग्रही आहेत, असे सूत्रांनी सांगितले.  

भाजपकडून माजी मंत्री पंकजा मुंडे, डॉ. संजय कुटे आणि माजी राज्यमंत्री परिणय फुके यांचे नाव जवळपास नक्की मानले जाते.  त्याशिवाय, माजी मंत्री जयकुमार रावल, आशिष शेलार आणि जयकुमार गोरे किंवा राहुल कूल यांच्या नावाचीही चर्चा आहे.  

आणखी १४ जणांना मिळू शकते मंत्री होण्याची संधी

मंत्रिमंडळाचा विस्तार करा असा मोठा दबाव शिंदे सेना आणि अजित पवार गटाकडून सत्तापक्षावर असल्याचे समजते. शिंदे यांच्याकडे इच्छुकांची मोठी गर्दी आहे. अजित पवार गट सोबत आला नसता तर आतापर्यंत आपल्याला मंत्रिपद मिळाले असते असे या पक्षातील काही आमदारांना वाटते.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विस्तार होणे आवश्यक आहे असे काही भाजप नेत्यांचेही मत आहे. राज्यातील भाजपच्या कोअर कमिटीने मंत्रिमंडळ विस्तारासाठी पक्षनेतृत्वाकडे आधीच परवानगी मागितली आहे.  सध्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांसह २९ मंत्री आहेत. त्यात भाजपचे १०, शिंदेसेनेचे १० आणि अजित पवार गटाचे ९ मंत्री आहेत. नियमानुसार मंत्रिमंडळाची सदस्यसंख्या ४३ राहू शकते. याचा अर्थ आणखी १४ जणांना मंत्रिपदे दिली जाऊ शकतात.

Web Title: Possibility of State Cabinet expansion after session; BJP 6, Shinde sena 5, Ajit Pawar group 3 ministerial posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.