ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3- ऑनलाइन रेल्वे तिकीट महाग होण्याची शक्यता आहे. इंडियन रेल्वेने अर्थमंत्रालयाकडे त्या संदर्भातील मागणी केली आहे. ऑनलाइन रेल्वे तिकीटांवर पुन्हा एकदा सर्व्हिस चार्ज लावण्याची मागणी इंडियन रेल्वेकडून करण्यात आली आहे. रेल्वे तिकीटांच्या ऑनलाइन बुकिंगवर आधीच अनेक पद्धतीने सूट दिली जाते आहे म्हणूनच रेल्वे तिकीटांवर देण्यात येत असलेली सर्व्हिस चार्जची सूट 30 जून नंतर स्थगित करावी. अर्थ मंत्रालयाकडून रेल्वेची ही मागणी स्वीकारली गेली तर ऑनलाइन तिकीट बूक करताना प्रवाशांना सर्व्हिस चार्ज द्यावा लागू शकतो.
यामध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर एसी बोगीच्या तिकीटावरील सर्व्हिस टॅक्समध्ये आर्ध्या टक्क्यांनी वाढ केली जाणार आहे. सध्या एसी क्लासमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 4.5 टक्के टॅक्स भरावा लागतो. जीएसटी लागू झाल्यानंतर हा टॅक्स 5 टक्के होइल.
विशेष म्हणजे रेल्वे बजेटमध्ये अर्थमंत्री अरूण जेटली यांनी ऑनलाइन रेल्वे तिकीटांवर सर्व्हिस टॅक्स रद्द करणार असल्याची घोषणा केली होती. त्यावेळी सर्व्हिस टॅक्स कधीपर्यंत रद्द केला जाणार आहे यासंदर्भातील माहिती जेटलींनी दिली नव्हती.
याआधी रेल्वे प्रवास सुरक्षेच्या कारणास्तव महाग होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली गेली होती. रेल्वे प्रवाशांवर सेफ्टी सेस लावण्याचा विचार केला जातो आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे सेफ्टी फंडासाठी योगदान देण्याचं आवाहन प्रवाशांना केलं होतं. पाच वर्षापूर्वी रेल्वे सेफ्टीसाठी एक लाख करोड देण्याचा निर्णय झाला होता.