मुंबई: आगामी नगरपालिका निवडणुकीत शक्य तिथे स्वबळावरच लढण्याची तयारी ठेवा. भाजपासह स्थानिक आघाड्यांशी युती करायची असेल, तर परस्पर ठरवू नका, आधी माझी परवानगी घ्या, असे आदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मंत्री, खासदार आणि आमदारांची बैठक ठाकरे यांनी आज मातोश्रीवर घेतली. भाजपाबरोबर आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती केलेली होती, पण आज तो पक्ष हिंदुत्वापासून दूर गेलेला दिसतो. विधानसभा निवडणुकीत ते आम्हाला संपवायला निघाले होते, पण कथित लाटेतही आमचे ६३ आमदार जिंकले. शिवसेनेचा कार्यकर्ता, आमदार, खासदार इतर कोणत्याही पक्षापेक्षा समर्पित आहे. तेव्हा उद्या नगरपालिकांमध्ये स्वबळावर लढताना दुप्पट उत्साहाने काम करावे लागेल, असे ते म्हणाले. आमदारांचाही तोच सूरउद्धव ठाकरे यांनी मंत्री, आमदार, खासदारांची मते जाणून घेतली. पक्षादेश असेल, तर आमची स्वबळावर लढण्याची तयारी आहे, असा बहुतेकांचा सूर होता. भाजपाचे आमदार, मंत्री शिवसैनिकांना दाबण्याचे काम ठिकठिकाणी करतात, अशा तक्रारी आमदारांनी या वेळी केल्या. (विशेष प्रतिनिधी)भाजपा मित्रपक्षांना गिळणारा पक्षभाजपा हा प्रादेशिक पक्षांना, मग ते त्याचे मित्र असले, तरी गिळू पाहणारा पक्ष असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले. जयललिता, ममता या त्यांच्या राज्यात भाजपाला रोखू शकतात, मग शिवसैनिक का नाही? आमचे आमदार भाजपापेक्षा अधिक दमदार आहेत, असे ते म्हणाले.भाजपावाले गुंडांना जवळ करतात! : भाजपामध्ये इनकमिंग सुरू आहे. कोणाकोणाला घ्यायचे, याची काही पथ्ये ते पाळत नाहीत. नाशिकमध्ये जो गुंड भाजपात गेला, तो आधी आमच्याकडे आला होता, पण असली डोकेदुखी नको, म्हणून आम्ही त्याला नाकारले. साधनसूचितेचा आव आणणाऱ्यांना असे गुंड कसे चालतात, असा चिमटाही उद्धव यांनी काढला.अपक्ष आमदार सेनेत : परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार मोहन फड यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. फड हे २०१४ मध्ये तत्कालीन शिवसेना आमदार मीराताई रेंगे पाटील यांचा पराभव करून जिंकले होते. ते मूळचे शिवसैनिक, पण आमदार झाल्यानंतर त्यांनी भाजपाला पाठिंबा देणारे पत्र दिले होते.
शक्य तिथे स्वबळावर!
By admin | Published: October 21, 2016 1:51 AM