मुंबई : कोविड १९ कालावधीत शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकांच्या सन्मानार्थ टपाल विभागाने मुंबईत मंगळवारी विशेष पाकिटाचे अनावरण केले.
भारतीय टपाल विभाग काळानुसार बदलत असून ग्राहकांना अधिकाधिक सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. फक्त पत्रव्यवहार, रजिस्टर, मनीआऑर्डरपुरते मर्यादित न राहता भारतीय टपाल विभागही अद्ययावत झाला आहे. ऑनलाईन बँकिग क्षेत्रातही टपाल विभागाने पाउल टाकले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
राष्ट्रीय टपाल सप्ताह सोहळ्यानिमित्त ९ ऑक्टोबरपासून टपाल कार्यालयाकडून विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. टपाल तिकिटे, पत्र, पाकिटे यांचा संग्रह करणाऱ्यांच्या सन्मानार्थ साजरा करण्यात येणाऱ्या फिलॅटेली दिवसाचे औचित्य साधून सोशल डिस्टन्स पाळत मुंबईत टपाल कार्यालयात मंगळवारी एका विशेष टपाल पाकिटाचे अनावरण मुख्य पोस्ट मास्टर जनरल हरिष आगरवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कुलाबा येथील आर्मी पब्लिक स्कूलच्या प्राचार्या विपन ज्योत सहगल आणि या पाकिटाची संकल्पना ज्यांची होती, त्या मुंबई विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल शोभा मधाळे उपस्थित होत्या.
शिक्षक, संस्थांना समर्पित
औपचारिक शिक्षणावर आधारित असलेल्या ई लर्निंग या शिक्षण प्रणालीद्वारे कोविड १९ महामारीच्या काळातही शिक्षणात खंड पडू नये म्हणून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे देणाऱ्या शाळा, कॉलेज आणि संस्थांमधील शिक्षक आणि ते शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी हे दहा रुपयांचे विशेष पाकिट काढण्यात आले आहे. संग्रह करणाऱ्यांच्या सन्मानार्थ १३ ऑक्टोबर हा दिवस फिलॅटेली दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून या पाकिटाचे अनावरण करण्यात आले आहे. या पाकिटावर १३ ऑक्टोबरचा उल्लेख आहे.