- मोसीन शेख
मुंबई : विधानसभा निवडणुकीत आणि निकालानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 'मी पुन्हा येईन' हे वाक्य सोशल मिडियावर चांगलेच चर्चेत आले होते. तर राज्यात सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडियात आता, “मी भाजपा सोडतोय” हे हॅशटॅग चर्चेचा विषय बनला आहे. फेसबुकवर सकाळपासून ही पोस्ट मोठ्याप्रमाणावर पोस्ट होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्यात ज्या प्रमाणे राजकीय वातावरण तापले आहे, त्याचप्रमाणे सोशल मिडियावर सुद्धा सत्तास्थापनेचा मुद्यावर चर्चा जोरात सुरु आहे. त्यामुळे राजकीय पोस्ट करताना अनेक हॅशटॅग वापरून ह्या पोस्ट केल्या जात आहे. मात्र कालपासून फेसबुकवर “मी_भाजपा_सोडतोय" हे हॅशटॅग मोठ्याप्रमाणावर सुरु आहे. पक्षाला सोडचिठ्ठी देत असलेले कार्यकर्ते हा हॅशटॅग वापरत आहे.
सद्याच्या परिस्थितीत भाजप नेते ज्याप्रमाणे वागत आहेत, हे सामान्य कार्यकर्त्यांना अजिबात आवडले नसल्याने मी भाजप सोडत असल्याचे या पोस्टमध्ये उल्लेख आहे. तर माजी पंतप्रधान व भाजपचे दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांची भाजपा आता राहिली नसून भाजपच्या नीतिमत्ता सोडून चाललेल्या राजकारणाला कंटाळून मी भाजप सोडतोय असेही उल्लेख ह्या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे.