- गजानन मोहोडअमरावती- विभागात १७ ते २८ आॅक्टोबर या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे ५,३८२ गावांमधील १२ लाख १८ हजार २७८ हेक्टरमधील खरिपाची पिके उद्ध्वस्त झालेली आहेत. यामध्ये १० लाख ५२ हजार २२ शेतकरी बाधित झाल्याच कृषी विभागाचा अहवाल आहे. या अनुषंगाने विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी बाधित क्षेत्राचे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश मंगळवारी जारी केलेत.यंदा कापूस वेचणीचा व सोयाबीन सोंगणी अन् मळणीचा हंगाम सुरु असतांना १८ आॅक्टोबर पासून सातत्याने अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे सोयाबीन हे जागेवरच थिजले. ज्यांनी सोंगणी केली, त्या गंजीमधील शेंगाना अंकुरण होत आहे. हीच स्थिती ज्वारीची आहे. कणसामधील दाण्यांचे बीजांकुरण होत आहे. कणसे काळी पडली आहेत. कापसाची बोंड सडायला लागली आहेत, तर फुटलेल्या बोंडामधील कापूस ओला झाल्याने प्रतवारी खराब झालेली आहे. कापूस सडायला लागला आहे. यामधील सरकीला कोंब फुटायला लागले असल्याचे विदारक चित्र शेतशिवारात आहे.विभागीय कृषी सहनिबंधकांच्या प्राथमिक नजरअंदाज अहवालान्वये अमरावती जिल्ह्यात १,४५,०५३ क्षेत्रातील खरिपाची पिके बाधित झालीत. अकोला ३,२३,५३५, बुलडाणा ५,१९,१९६, यवतमाळ १,०४,५५९ व वाशिम जिल्ह्यात १,२५,९३५ हेक्टरवरील खरीप मातीमोल झालेला आहे. पंचनामे करण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेशदहा दिवसांपासून होत असलेल्या अवेळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहेत. या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिले आहेत. ग्रामसेवक, कृषिसहायक व तलाठी यांनी संयुक्त सर्वेक्षण व पंचनामे करून अहवाल सादर करणार आहेत. ज्या ठिकाणी ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले, अशा ठिकाणी संयुक्त सर्वेक्षणाची तरतूद आहे. त्यानुसार कापणी केलेल्या, जमा करून ठेवलेल्या, कापणीस आलेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून संयुक्त स्वाक्षरी अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अवकाळी पावसाचा शेतीला मोठा फटका; १२ लाख हेक्टरमधील पीक बाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 5:29 PM