शशिकांत ठाकूर,कासा- ग्रामपंचायत निवडणूकीचा खर्च सादर न केल्याबद्दल डहाणू तालुक्यातील तवा ग्रामंपचायतीच्या सात माजी सदस्यांना पाच वर्षे निवडणूक लढण्यासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे तर सरपंचांसह चार सदस्यांना मात्र खर्च सादर केल्याने दिलासा मिळाला आहे.
तालुक्यातील तवा ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी सन २०११ ची ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी केलेल्या खर्चाचा तपशील सादर केलेला नसल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशी तक्रार पंचायत समितीचे माजी सदस्य सुधीर नम यांनी २३ आॅक्टोबर २०१५ रोजी पालघरच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या सदस्यातील सरपंच लतिका बालशी यांच्यासह लहू बालशी, विठ्ठल डबके आणि सुनिता गोंड या चार सदस्यांनी खर्चाचा तपशिल सादर केला त्यामुळे त्यांना नुकत्याच झालेल्या अंतिम सुनावणीत क्लीन चीट देण्यात आली तर उर्वरित सात सुभाष केदार, नरोत्तम झाटे, कलावती उराडे, सुमन कोल्हेकर, रेखा रावते, भरत केदार, बबिता देसाई या साद माजी सदस्यांना मात्र निवडणूक खर्च सादर केलेला नाही. त्यामुळे त्यांना पाच वर्षे निवडणूक लढविण्यासाठी अपात्र ठरविण्याचा आदेश अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)