मुंबई : सिनेमा पाहायला जावे किंवा घरी टीव्ही लावावा. आता चांगला कार्यक्रम लावू, असे मनामध्ये चालू असताना अचानक एक जाहिरात लागायची. ही जाहिरात पाहून अनेकांनी डोळे बंद करून घेतले असतील किंवा मान फिरवली असेल. कारण या जाहिरातीत विद्रूप चेहरा झालेली मुलगी दिसायची आणि तंबाखूमुळे कर्करोगाचा धोका वाढतो, असा आवाज ऐकू यायचा. मुखाच्या कर्करोग झालेल्या मध्य प्रदेशातील सुनीता तोमरने तंबाखूविरोधी मोहिमेचा चेहरा होण्याचे धाडसी पाऊल उचलले होते. याच सुनीताचा आज १ एप्रिल रोजी पहाटे चार वाजता मृत्यू झाला. सुनीता २८ वर्षांची होती. वयाच्या बाविसाव्या वर्षी तिला तंबाखू खाण्याची सवय लागली. जुलै २०१३ ला सुनीता जेव्हा मुंबईच्या टाटा रुग्णालयात उपचारासाठी आली, तेव्हा तिला चौथ्या स्टेजचा मुखाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. सुनीतावर येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. टाटा रुग्णालयात उपचार घेत असताना बाह्यरुग्ण विभाग, वॉर्डमध्ये असणारे रुग्ण पाहून तिचे मन हेलावून गेले होते. २०१४ साली तंबाखूविरोधी अभियानाची ती पोस्टर गर्ल म्हणून निवडली गेली. भारतात ही जाहिरात १७ भाषांमध्ये विविध वाहिन्यांवर आणि विविध सिनेमागृहांमध्येही दाखविली गेली.सुनीताचा कर्करोग काही प्रमाणात बरा झाला होता, मात्र तरीही तो नव्याने परतण्याची शक्यताही होतीच. तसेच झाले आणि तिचा कर्करोग बळावला. तिला दोन दिवसांपूर्वी रुग्णालयामध्ये तब्येत खालावल्यावर भरती केले, तेव्हा तिला श्वसनाचा त्रास होता, तसेच तिचे वजनही मोठ्या प्रमाणात कमी झाले होते, असे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.पंतप्रधानांना लिहिलेले पत्र... दोन दिवसांपूर्वीच सुनीता हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तंबाखूविरोधी अभियानासंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. खासदार दिलीप गांधी यांनी कर्करोग हा फक्त तंबाखू खाण्यानेच होत नाही. यासंदर्भातील सर्व सर्वेक्षणे परदेशात झाली आहेत. भारतात तेंदूपत्ता व विडी उद्योगावर चार कोटी लोकांचा रोजगार अवलंबून आहे, असेही त्यांनी यासंदर्भात सांगितले होते. १ एप्रिलपासून तंबाखू उत्पादनांवरील धोक्याची सूचना देणारी चित्रे त्याच्या वेष्टनाचा ८५ टक्के आकार व्यापतील, असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यावर स्थगिती आणण्यात आली.खा. दिलीप गांधी यांच्या मतावर पंतप्रधानांना कळविताना सुनीताने लिहिले होते, की जेव्हा मी तंबाखू खायला सुरुवात केली तेव्हा माझे आयुष्य उद्ध्वस्त होईल, असे वाटले नव्हते़ मात्र इतरांना तरी याबाबत धोक्याची सूचना द्यायची, हे मी ठरविले आहे. आज कोणी तंबाखू खाताना दिसले तर ते मला सहन होत नाही. तंबाखूपासून तरुणांना लांब ठेवले पाहिजे, हेच माझे ध्येय आहे.