ठाणे : शहरातील कोलबाड परिसरात रविवारी लावलेल्या पोस्टरवर शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होवोत, अशी प्रार्थना आई तुळजाभवानीकडे करणारे अशोक राजगुरू पाटील यांचे पोस्टर राज्यभर चर्चेचा विषय ठरले होते. पण, हे पोस्टर लावणारे अशोक पाटील कोण आहेत, याबाबत ठाण्यातील शिवसैनिकांना थांगपत्ता नव्हता. पाटील हे मुंबईतील शिवसैनिक असल्याचे ठाण्यातील शिवसैनिक सांगत होते. पण, दिवसभर हे पोस्टर कोलबाड परिसरातून हलवण्यात आले नसल्याने शिंदे हे मुख्यमंत्री होवोत, अशी सुप्त इच्छा ठाण्यातील शिवसैनिकांच्या मनात असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. सोशल मीडियावर दिवसभर या पोस्टरचे फोटो व्हायरल झाले होते.पोस्टरवर ‘आमच्या ठाण्याचे लाडके ढाण्या वाघ एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवोत, हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना’ असे त्यामध्ये नमूद केलेले आहे. याबाबत ठाणे महापालिकेतील सभागृह नेते व जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांना विचारले असता ते म्हणाले की, शिंदे यांच्यावरील प्रेमापोटी आणि स्वत:च्या प्रसिद्धीसाठी हे पोस्टर लावण्यात आले असावे. मात्र, हे पोस्टर लावणारे पाटील कोण आहेत, याची आपल्याला कल्पना नाही. शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आवडेल, असेही म्हस्के यांचे म्हणणे आहे.च्विधानसभा निवडणूक निकालाच्या आठवडाभरानंतरही शिवसेना-भाजपचा सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटताना दिसत नाही. दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर अडून बसल्याने पेच दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच, आदित्य ठाकरे यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे नाव पुढे येत असताना, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवोत, अशी इच्छा व्यक्त करणारे पोस्टर मुंबई मराठी वाहतूक व्यापार सेना संघटनेचे अध्यक्ष अशोक पाटील यांच्या छायाचित्र व नावासकट झळकले.
सर्वत्र चर्चा : एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा देणारे पोस्टर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2019 6:34 AM