उबाठा शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी वाशिम-यवतमाळच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. तसेच पोहरादेवीचे दर्शन घेतले. यावेळी ठाकरेंनी शिंदे-भाजपा-पवार यांच्यावर निशाना साधला आहे. ठाकरेंच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी पोस्टर, बॅनर लावण्यात आले होते. अमरावतीत देखील ठाकरेंचे बॅनल लावण्यात आले होते. तर त्यांना डिवचण्यासाठी नवनीत राणा आणि रवी राणा दांम्पत्याने हनुमान चालिसाचे बॅनर लावले होते. यावरून आता अमरावतीत पोस्टर फाडो वॉर रंगले आहे.
उद्धव ठाकरे आज सायंकाळी अमरावती दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, त्यांच्या दौऱ्या आधी राणा दाम्पत्याकडून शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. अमरावती शहरातील गर्ल्स हायस्कूल चौकात उद्या हनुमान चालीसाचे पठण करणार असल्याचे राणा दाम्पत्याचे बॅनर लावण्यात आले आहेत. उद्या ज्या ठिकाणी हनुमान चालीसा पठण होणार आहे, तेथून काही अंतरावर उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेणार आहेत. त्यामुळे आता या बॅनरबाजीवरून वाद चिघळला असून उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर फाडले आहेत.
राणा दाम्पत्याने गर्ल्स हायस्कूल चौकात हनुमान चालीसेचे पठण करून दाखवावे, त्यांना त्यांच्या पायावर परत जाऊ देणार नाही असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे. याला प्रत्यूत्तर म्हणून युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर फाडले आहेत. जयस्तंभ चौकातील उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर फाडल्याने अमरावतीत वातावरण पेटले आहे. राणा समर्थक एवढ्यावरच थांबलेले नाहीत तर त्यांनी पोलिसांच्या समोरच विश्राम भवनावरील उद्धव ठाकरे यांचे पोस्टर फाडले आहेत.
पोलिसांनी कार्यकर्त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. परंतू ते पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. याच विश्राम भवनात उद्धव ठाकरे मुक्कामाला असणार आहेत. तर महापालिकेनेही वातावरण चिघळू नये म्हणून राणा दांम्पत्याचे काही बॅनर काढून टाकले आहेत. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली आहे. अतिक्रमण करून बॅनर लावले असल्याने महानगरपालिकेने ही कारवाई केली आहे.