सांगली : निवडणुकीपुरते किंवा स्वत:च्या फायद्यासाठी समाजाचा वापर करायचा आणि नंतर समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचे, ही नेत्यांची दुटप्पी भूमिका यापुढे सहन केली जाणार नाही. कोपर्डी अत्याचार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी २७ सप्टेंबरला सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात जिल्ह्यातील जे मराठा राजकीय नेते सहभागी होणार नाहीत, त्यांच्या नावाचे पोस्टर स्टेशन चौकात लावून त्यांचा निषेध केला जाईल, असा इशारा विजयसिंह महाडिक यांनी शुक्रवारी दिला. मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजनासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. महाडिक पुढे म्हणाले की, कोपर्डी घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यभर मराठा समाजाच्यावतीने मोर्चे काढण्यात येत आहेत. या मोर्चांना प्रतिसादही मोठा मिळत आहे. त्यामुळे सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात कोणतेही राजकारण न आणता सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र करीत मोर्चाचे नियोजन करण्यात येणार आहे. जी मराठा नेतेमंडळी या मोर्चात सहभागी होणार नाहीत, त्यांची नावे जाहीर करण्यात येणार असून त्याचे पोस्टर लावून, त्यांचा निषेध करण्यात येणार आहे. या मूक मोर्चामध्ये कोपर्डी घटनेच्या निषेधाबरोबरच मराठा आरक्षणाचा मुद्दा, अॅट्रॉसिटी कायद्यातील दुरूस्तीसह शिवस्मारक तातडीने व्हावे, अण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी मिळावा, याही मागण्या मांडण्यात येणार आहेत.सम्राट महाडिक म्हणाले की, मराठा समाजावर आतपर्यंत अन्याय होत आला असून त्याला वाचा फोडण्यासाठी एकत्र येणे आवश्यक होते. मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने ‘देर आए दुरूस्त आए’ असेच म्हणावे लागेल. २७ सप्टेंबरचा मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार आहे. यावेळी रणजितसिंह नाईक, सुशांत पाटील, मनीषा माने, डी. एस. मुळीक उपस्थित होते. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील बैठकीचे नियोजनशनिवार दि. १० सप्टेंबर - बालाजी मंगल कार्यालय, मिरज, रविवार दि. ११ सप्टेंबर सकाळी ११ वा. - भैरवनाथ मंगल कार्यालय, विटा, दुपारी १२ वा.- राजवीर मंगल कार्यालय, कडेपूर, दुपारी ४ वा.- राजारामबापू नाट्यगृह, इस्लामपूर, रविवार दि. १८ सकाळी ११ वा.- शिराळा, दुपारी ४ वा.- समृध्दी हॉल, तासगाव, १९ सप्टेंबर दुपारी १२ वा.- बालाजी मंगल कार्यालय, जत, दुपारी ४ वा.- कवठेमहांकाळ.
मोर्चाला न येणाऱ्या नेत्यांचे पोस्टर लावू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2016 12:55 AM