आमदार बच्चू कडू यांनी महायुतीविरोधात चांगलेच दंड थोपटले आहेत. राजकीय समीकरणे कधी बदलतील याचा नेम नाही, मंत्रिमंडळात समावेश केला नाही म्हणून शिंदे सरकारवर उघडपणे बोलणाऱ्या कडू यांनी शिंदेंसाठीच ठाकरे सरकारमधील मंत्रिपद सोडून साथ दिली होती. आज हेच बच्चू कडू आता भाजपविरोधी पर्यायाने नवनीत राणाविरोधी भुमिका घेत आहेत. अशातच आता आघाडीच्या दन उमेदवारांना पाठिंबा देण्याची तयारीही त्यांनी सुरु केली आहे.
अमरावतीमध्ये कडू यांनी प्रहार पक्षाचा स्वतंत्र उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रम्हदेव जरी समोर आला तरी माघार नाही, असे आव्हानच त्यांनी महायुतीला दिले आहे. असे असताना जालन्यात काँग्रेस आणि अहमदनगरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा देण्यावर कडू यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
आता अमरावतीचे काही राहिलेले नाही, पोस्टमार्टम झालेला आहे. फक्त निकाल बाकी आहे. आम्ही युतीतून बाहेर जावे की राहावे तो त्यांचा निर्णय असेल. सध्या महायुतीसोबत आहे. त्यांनी जो निर्णय घेतला त्याचे मी स्वागत करेन. कोर्टात केस पेंडिंग असतानासुद्धा इथे उमेदवारी दिल्या जातात. या तानाशाहीच्या विरोधात आमची खरी लढाई आहे, असे कडू यांनी म्हटले आहे.
आमच्या जिथे ग्रामपंचायत आहेत तिथे निधी दिला जात नाही, तर जो आहे तो देखील काढून घेतला जातो. म्हणून आम्हाला आमचे निर्णय घ्यावे लागतील. आमचा पक्ष दिल्लीत आणि मुंबईत चालत नाही गावा खेड्यात चालतो. आम्हाला दिल्ली मुंबईची वारी करायची गरज नाही. जालन्यात काँग्रेसला मदत करावी असे कार्यकर्त्यांचे मत आहे. मात्र अजून निर्णय नाही पूर्ण बैठका झाल्यावर निर्णय घेऊ, असे सुतोवाच कडू यांनी केले.
प्रत्येक जिल्ह्यातील काही कार्यकर्ते असं सांगत आहे की आम्हाला भरपूर त्रास झाला आहे. काहीजण सांगत आहेत की निलेश लंके चांगले आहेत. त्यामुळे हा सगळा विचार करून आम्हाला एका निर्णयापर्यंत जावे लागणार आहे, असेही संकेत कडू यांनी दिले आहेत. लंके महाविकास आघाडीचे अहमदनगरमधील उमेदवार आहेत.