मुंबई : राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थी व पालक यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांचे हित लक्षात घेऊन राज्यातील दहावी आणि बारावी राज्य मंडळाच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार दहावीच्या परीक्षा जूनमध्ये, तर बारावीच्या परीक्षा मे महिन्यांत होणार आहेत. त्यादृष्टीने परिपूर्ण तयारी करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागाच्या बैठकीत दिल्या. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातील माहिती ट्विटद्वारे दिली असून, सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाची बैठक सोमवारी घेण्यात आली. सध्याच्या परिस्थितीत आपले आरोग्य हीच आपली प्राथमिकता असल्याने दहावी, बारावीच्या राज्यातील तब्बल ३० लाख विद्यार्थ्यांच्या ऑफलाइन परीक्षा घेणे योग्य ठरणार नाही. उच्च शिक्षण व व्यावसायिक अभ्यासक्रम यांच्या प्रवेशाचे वेळापत्रक लक्षात घेऊन दहावी, बारावीच्या पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येईल व नवीन तारखा जाहीर करण्यात येतील, असे शिक्षणमंत्री गायकवाड यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला शालेय शिक्षणमंत्री गायकवाड यांच्यासोबत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री बच्चू कडू, मुख्य सचिव सीताराम कुंटे, शालेश शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड, माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील, राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.
सगळ्यांशी चर्चा केल्यानंतरच निर्णयविद्यार्थी शिक्षक, लोकप्रतिनिधी, पालक, शिक्षणतज्ज्ञ या सगळ्यांशी चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले. राज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे, तसाच तो इतर परीक्षा मंडळांना कळवला जाईल आणि त्यांनीही आपल्या परीक्षांच्या तारखांबाबत फेरविचार करावा, असे विनंती पत्र दिले जाईल, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
कार्यप्रणाली निश्चित करण्याचे दिले निर्देशपरीक्षा घेणाऱ्या यंत्रणेतील सर्व कर्मचारी-अधिकारी आणि पर्यवेक्षकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे, तसेच याची एक परिपूर्ण कार्यप्रणाली (एसओपी) शालेय शिक्षण विभागाने निश्चित करावी, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले.
- ज्या तारखांना १२च्या परीक्षा जाहीर करू त्याच तारखांना त्या घेता याव्यात, यादृष्टीने व्यवस्था विकसित करण्यात यावी. - केंद्रांची संख्या वाढवावी, शाळा, महाविद्यालयांच्या इमारती निश्चित कराव्यात, मोठे हॉल शोधले जावेत, विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतरावर बसवावे, परीक्षा केंद्राचे निर्जंतुकीकरण याकडे लक्ष देण्यात यावे.
‘परीक्षा सुधारित कार्यक्रमानुसारच घ्या’बारावीच्या परीक्षा घोषित सुधारित कार्यक्रमानुसारच घेतल्या जाव्यात. हे करताना बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढे आयआयटी, जेईई आणि नीटच्या परीक्षा देऊन इतर उच्च शिक्षण अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावयाचे असतात, हे लक्षात घ्यावे. त्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिल्या.