योगेश पांडे, नागपूरराज्य जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदभरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. या पदांसाठी केवळ अभियांत्रिकी पदविका उमेदवारांचेच अर्ज मागविण्यात आले होते. त्यामुळे आपल्यावर अन्याय होत असल्याचा आरोप करीत अभियांत्रिकी पदवीप्राप्त इच्छुक उमेदवारांनी राज्यातील विविध न्यायालयांमध्ये याचिका दाखल केल्या. हे ध्यानी घेत विभागानेया प्रक्रियेला तात्पुरती स्थगितीदिली आहे. ‘लोकमत’नेच सर्वांत आधी या प्रकरणावर प्रकाश टाकला होता.जलसंपदा व जलसंधारण विभागातील गट ‘ब’अंतर्गत येणाऱ्या १ हजार २५६ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदांसाठी राज्यस्तरीय सरळसेवा निवड समितीच्या वतीने २५ मार्च रोजी राज्यातील सहा विभागांतील जिल्हास्थानी महाआॅनलाइनच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविण्यात येणार होती.पदनिवडीसाठी स्थापत्य अभियांत्रिकीमधील तीन वर्षे कालावधीची पदविका आवश्यक असल्याची अट ठेवण्यात आली व यामुळे चार वर्षे ‘बीई’ (बॅचलर आॅफ इंजिनीअरिंग) केलेले उमेदवारांचे ‘आॅनलाइन’ अर्ज नाकारण्यात आले. त्यामुळे संतप्त इच्छुक उमेदवारांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे फिर्याद दाखल केली. यादरम्यान, उच्च न्यायालयाच्या नागपूर तसेच औरंगाबाद खंडपीठांतही याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिकांवर अद्याप अंतिम सुनावणी झालेली नाही. प्रकरण न्यायप्रविष्ट असतानादेखील भरती प्रक्रिया राबविली तर अडचण निर्माण होऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन संबंधित प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
‘जलसंपदा’ची पदभरती स्थगित
By admin | Published: March 11, 2016 4:19 AM