- ब्रह्मानंद जाधव, बुलडाणा
आर्थिक श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती खूप मोठी असते, याचाच प्रत्यय बुलडाणा येथील शिवण कामावर पोटाची खळगी भरणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या कृत्यातून दिला आहे. श्रीमंतांकडून बिनवापराचे वस्त्रे घेऊन ते चांगले शिवून, स्वच्छ करून गरिबांना वाटप करण्याचा उपक्रम येथील संजग घाडगे हे गत सहा वर्षांपासून राबवित आहेत.जेमतेम बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर, घाडगे यांनी स्वयंरोजगाराचाच पर्याय निवडला. येथील त्रिशरण चौकात शिलाई मशिनद्वारे फाटलेले कपडे व बॅग शिवण्याचे काम सुरू केले. दिवसाकाठी अनेक गरीब, निराधारांचे दु:ख त्यांच्यासमोर यायला लागले. तेव्हा त्यांनी निराधारांना मदत करण्यासाठी समाज सेवार्थ दान केंद्र सुरू केले.‘आपल्या घरातील उपयोगात नसलेल्या वस्तू, बुट, चप्पल, चादर, सतरंजी, कपडे, शालेय साहित्य, समाजातील गरीब होतकरू, हीन-दीनांची गरज भागवू शकणारे साहित्य येथे जमा करावे,’ असा फलक त्यांनी आपल्या दुकानाच्या ठिकाणी लावला. अनेक लोकांनी त्यांच्या या कार्याला प्रतिसाद दिला आणि त्यांच्याकडे गरिबांची गरज भागविणाऱ्या वस्तू, कपडे जमा व्हायला लागले. दिवसाला अनेक गरजू त्यांच्याकडे विविध वस्तूंसाठी येतात. या उपक्रमात त्यांच्या पत्नी बेबी घाडगे यासुद्धा त्यांना सहकार्य करतात. गरजवंतांसाठी संपर्क डायरीअधिकाऱ्यांपासून ते एखाद्या कारागिरापर्यंतचे संपर्क क्रमांक संजय घाडगे यांच्याकडे आहेत. त्यामुळे कुठलेही काम अडल्यास संजय घाडगे यांच्याकडे संबंधित व्यक्तीचा मोबाइल क्रमांक मिळतो. त्यामुळे संजय घाडगे यांची ओळख ‘संपर्क डायरी’ म्हणूनदेखील झाली आहे.