ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 2 - दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी गुरमेहर कौर प्रकरणाच्या वादात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पावर यांनी उडी घेतली आहे. त्यांनी याप्रकरणी भाजपा सरकारवर नाव न घेता 'पॉवर' वार केला आहे. गुरमेहर कौर प्रकरणी विरेंद्र सेहवाग, योगेश्वर दत्तर, विद्या बालन, अनुपम खेर नंतर आता या वादात शरद पवार यांनी उडी घेतली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, सर्व जाती-धर्माच्या लोकांच्या हिताची जपणूक करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची असते, याचा पूर्ण विसर सत्ताधाऱ्यांना पडला आहे. गुरमेहर कौरला ज्या धमक्या येत आहेत हे पहिले प्रकरण नाही. दुर्दैवाने देशाची सूत्रे ज्यांच्या हातात आहेत, त्या घटकांकडून स्त्रीचा सन्मान ही बाब शिल्लक राहिली नसल्याची टीका भाजपा सरकारचे नाव न घेता शरद पवार यांनी केली.
(गुरमेहर कौर प्रकरणी भाजपा बॅकफूटवर)
सर्वसामान्य जनतेमध्ये एक वेगळे वातावरण तयार करण्याची गरज आहे. गुरमेहर हे प्रकरण दिल्लीचे असले तरी प्रसिद्धीत न आलेली अशी शेकडो उदाहरणे ठिकठिकाणी ऐकायला मिळतात. एका समाजविघातक विचाराचा पगडा दहशतीच्या माध्यमातून पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याला सर्वांनीच विरोध केला पाहीजे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, गुरमेहर कौर प्रकरणी सुरु असलेल्या वादात भाजपाने नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसत आहे. बुधवारचा घटनाक्रम पाहता भाजपाने बॅकफूटवर जाण्याचा निर्णय घेतल्याचं लक्षात येत आहे. भाजपाच्या काही नेत्यांनी खासगीत बोलताना गुरमेहर कौरला एकटी सोडलं पाहिजे असं मान्य केलं आहे. या संपुर्ण प्रकरणाला चुकीच्या पद्धतीने हाताळण्यात आलं असं पक्षाला वाटत आहेत.
गुरमेहर कौरवर निशाणा साधणारा क्रिकेटर विरेंद्र सेहवाग आणि अभिनेता अनुपम खेरदेखील बॅकफूटवर जाताना दिसले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनातून माघार घेत पुन्हा जालंधरला जाण्याचा निर्णय गुरमेहरने घेतल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी समर्थनार्थ उतरले होते. याआधी गुरमेहर कौरला ऑनलाइन ट्रोल केलं जात असताना बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरमेहर कौरच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणण्याच्या प्रकाराबद्दल आणि तिला अभाविपकडून दिल्या जाणाऱ्या धमक्यांबद्दल संताप व्यक्त केला आहे. तिच्या महाविद्यालयानेही गुरमेहरच्या कृतीचे समर्थन केले आहे.आपण कोणाला घाबरत नाही. मात्र अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्याविरोधातील (अभाविप) मोहीम थांबवत आहोत, असे गुरमेहरने म्हटले. काल ती आपल्या जालंधर या गावी गेली. तेथील माजी सैनिकांच्या संघटनेने गुरमेहरला दिल्या जाणाऱ्या धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि आम्ही तिच्यामागे उभे आहोत, असे म्हटले आहे. तिच्या आजोबांनीही आपण गुरमेहरच्या मागे ठामपणे उभे राहू, असे म्हटले.