मुंबई : उत्तर प्रदेश ही केवळ देवादिकांचीच भूमी नाही, तर आजही देशाचा पंतप्रधान घडविण्याची ताकद याच राज्यात आहे, असे सांगतानाच आपल्या राज्याची नकारात्मक प्रतिमा निर्माण न करण्याचे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज केले. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित यूपी कॉन्क्लेव्हमध्ये ते बोलत होते. आपल्या राज्याची प्रतिमा आता बदलली असून, राज्य विकासाकडे जात आहे. हे पाहण्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी आपण राज्यात या, असे आवाहन त्यांनी केले. वस्तू आणि सेवा क्षेत्राचे सर्वांत मोठे मार्केट आपलेच राज्य आहे. गुंतवणुकीसाठी चांगले वातावरण आहे. गुन्हेगारीबद्दल जेवढे बाहेर बोलले जाते तसे काहीही आमच्याकडे नाही. आपल्या सरकारने अनेक स्मार्ट सिटींच्या उभारणीचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले. ४५ मोठ्या प्रकल्पांमध्ये राज्यात ३३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येऊ घातली आहे. ‘यूपी कॉन्क्लेव्ह’च्या माध्यमातून ५० हजार कोटींची गुंतवणूक आपल्या राज्यात येईल, असा विश्वास अखिलेश यादव यांनी व्यक्त केला. उत्तर प्रदेशातील अनेक लोक परराज्यात रोजगारासाठी स्थलांतरित का होतात, या पत्रकारांच्या प्रश्नात अखिलेश यादव हसत म्हणाले की, उत्तर प्रदेशचे राज्यपाल (राम नाईक) महाराष्ट्रातून आमच्याकडे आलेले आहेत. असे बोललो म्हणून माझ्याविरुद्ध काही केस तर होणार नाही ना? (विशेष प्रतिनिधी)अखिलेश यादव आलेअन् निराश करून गेलेअखिलेश यादव हे गुरुवारी मुंबईत आले. उद्योगपती आणि व्हीआयपींशी त्यांनी संवाद साधत आपल्या राज्यात गुंतवणुकीचे आव्हान केले; पण समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांची त्यांनी निराशा केली. प्रदेशाध्यक्ष आ. अबू आझमी यांचा साधा उल्लेखही कुठे केला नाही. या प्रकाराने नाराज झालेले अबू आझमी छोट्या यादवांना निरोप देण्यासाठी विमानतळावर गेले नाहीत. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित, ‘यूपी कॉन्क्लेव्ह’मध्ये त्यांनी भाषण दिले. या हॉटेलपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सपाच्या प्रदेश कार्यालयातही ते गेले नाहीत. नंतर आयोजित पत्रपरिषदेत अखिलेश यादव केवळ पाच मिनिटे बोलले. तीन-चार प्रश्नांना उत्तरे देऊन ते अचानक उठून निघून गेले. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी बाजू सावरून घेण्याचा प्रयत्नकरीत पत्रकारांना काही माहिती दिली.
पंतप्रधान घडविण्याची ताकद उत्तर प्रदेशातच
By admin | Published: September 11, 2015 3:04 AM