ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - नव्या सरकारचे कान पकडण्याची ताकद जनतेकडे आहे, जनतेस गृहीत धरून राज्य करता येणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिला आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून नव्या भाजपा सरकारला समजुतीच्या चार गोष्टी सांगतानाच राज्य अखंड ठेवावे व जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करावी, असेही उद्धव यांनी म्हटले आहे.
भाजपाच्या कालच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावल्यानंतर उद्धव ठाकरेंनी या सोहळ्याचे भरभरून कौतुक केले, मात्र त्यावेळी सरकारला त्यांच्या जबाबदारीची आठवण करून देण्यासही ते विसरले नाहीत. नवे सरकार हे नव्या नवरीसारखे असते. सासूची मर्जी सांभाळण्यासाठी प्रथम नववधू जबाबदारीने वागते, मात्र काळ पुढे सरकल्यावर सून सासूबाईंना वरचढ होते. महाराष्ट्राची जनता 'खाष्ट' नसली तकी उत्तम सासू असल्याचे सांगत सासूबाईंना खुश करावेच लागेल. सासूपेक्षा वरचढ होण्याचा प्रयत्न झालाच तर नव्या सरकारचे कान पकडण्याची ताकद जनतेकडे आहेच, असा इशाराही त्यांनी दिला आहे. शिवरायांनी जसे हिंदवी स्वराज्य खर्या अर्थाने रयतेचे राज्य बनविण्याचा प्रयत्न केला तसाच राज्यकारभार नवे मुख्यमंत्री करतील अशी आशा लेखात व्यक्त करण्यात आली आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात -
- नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा तर जोरकस झाला. थाटामाटाच्या बाबतीत कसलीच कमतरता तेथे नव्हती. महाराष्ट्राच्या लौकिकाला साजेसा, त्यात भर घालेल असाच हा भव्य सोहळा होता. शिवरायांच्या विचाराने राज्य चालविण्याचा उच्चार नव्या मुख्यमंत्र्यांनी या आधीच केला आहे. त्यामुळे शिवरायांनी जसे हिंदवी स्वराज्य खर्या अर्थाने रयतेचे राज्य बनविण्याचा प्रयत्न केला तसाच राज्यकारभार नवे मुख्यमंत्री करतील अशी आशा आहे.
- शेवटी राज्यातील शेठ, साहुकार नव्हे तर फाटका व काटक मावळा हीच शिवरायांच्या स्वराज्याची ताकद होती. महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांनी हे सदैव ध्यानात ठेवायला हवे. नवे सरकार हे नव्या नवरीसारखे असते. सासूबाईंची मर्जी सांभाळण्यासाठी व कुटुंबास खुश करण्यासाठी नववधू सुरुवातीला जबाबदारीने वागत असते. अंगावर पडेल ते काम मनापासून करीत असते व आपला जन्म यासाठीच झाल्याचे समाधान मानून दिवस ढकलीत असते, पण जसजसा काळ पुढे सरकतो तसतशी सूनबाई सासूबाईंना वरचढ होते. महाराष्ट्राची जनता ‘खाष्ट’ नसली तरी उत्तम ‘सासू’ आहे. सासूबाईस खूश करावे लागेल हे तर नक्कीच, पण सासूबाईंपेक्षा वरचढ होण्याचा प्रयत्न झालाच तर नव्या सरकारचे कान पकडण्याची ताकद जनतेकडे आहे. जनतेस गृहीत धरून राज्य करता येणार नाही. राजकारण बाजूला ठेवून मुख्यमंत्र्यांनी आता राज्य करावे. राज्य अखंड ठेवावे व जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करावी.
- आश्वासनांची पूर्तता म्हणजे जादूची कांडी फिरविणे नाही हे खरेच, पण जनता नव्या सरकारकडे एका अपेक्षेने पाहत आहे. नव्या राज्यकारभाराची सुरुवात म्हणजे जनतेच्या आशा-आकांक्षांच्या पूर्ततेची पहाट आहे असा विश्वास जनमानसाच्या मनात रूजवावा लागेल. हा विश्वासच सुशासनाचा पाया असतो. नवीन सरकार हा पाया भक्कमपणे उभारील अशी अपेक्षा आहे.