मुंबई - राज्यातील सत्तांतराचा सर्वाधिक फटका भाजपला बसला आहे. मात्र भाजपसोबत आता विदर्भातील रुग्णांनाही सत्तांतराचा त्रास होणार असं दिसत आहे. त्याचं कारणही तसच असून उपराजधानी नागपूर येथे असलेलं मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष मुंबईला हलवण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष मुंबईला हलवल्यामुळे बुलडाणा ते गडचिरोली येथील रुग्णांची परवड होणार असून मदतीसाठी या रुग्णांना मुंबईच गाठावी लागणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात विदर्भातील रुग्णांसाठी नागपूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष सुरू केले होते. त्यामुळे विदर्भातील रुग्णांना मोठा आधार मिळाला होता. मागील काही वर्षांत सुमारे 50 कोटी रुपयांच्या निधीचे वाट या कक्षातून झाले आहे.
दरम्यान माजीमंत्री आणि भाजपनेते चंद्रशखेर बावनकुळे यांनी विदर्भातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यावर नवनिर्वाचित मंत्री नितीन राऊत यांनी येथील वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरू करण्यासाठी प्रयत्न करू असं म्हटले आहे.
आधीचे मुख्यमंत्री विदर्भातील होते, म्हणून रुग्णांना त्याचा फायदा झाला आहे. विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईचे आहेत. मात्र त्यांनी विदर्भातील रुग्णांसाठी येथील कक्ष पुन्हा कार्यान्वित करावे, अशी मागणी विदर्भवासियांकडून करण्यात येत आहे.