नागपूर : मनपा निवडणुकांसाठी शुक्रवारी उमेदवारांच्या नावांचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर राजकीय पक्षांमधील अंतर्गत धुसफूस समोर आली. तिकीट न मिळाल्यामुळे भाजपाच्या काही इच्छुकांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर शक्तिप्रदर्शन केले. तर जागावाटपावरून कॉंग्रेसच्या नेत्यांविरोधात कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. एकूणच प्रचाराची धामधूम सुरू होण्याअगोदरच पक्षांमध्ये राजकीय दंगल सुरू झाल्याचे दिसून आले.शुक्रवारी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अखेरची तारीख असल्यामुळे ‘एबी फॉर्म’ नेमके कुणाला मिळणार यासंदर्भात भाजपा, कॉंग्रेस, बसपाच्या उमेदवारांमध्ये गुरुवारपर्यंत संभ्रम कायम होता. अखेर शुक्रवारी सकाळी चित्र स्पष्ट झाले. भाजपाकडून तब्बल २४ विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारण्यात आली. यावरून काही नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानासमोर श्रीकांत आगलावे यांच्यासह काही इच्छुकांच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शन केले. तर प्रस्थापित नगरसेवक गोपाळ बोहरे यांच्या समर्थकांनी प्रतापनगर भागात निदर्शने केली. बसपाच्या चार विद्यमान नगरसेवकांचे तिकीट कापण्यात आले तर तीन माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारण्यात आली. (प्रतिनिधी)‘एबी फॉर्म’वरून वाददुसरीकडे अखेरच्या दिवशी काँग्रेसमध्ये ‘एबी फॉर्म’वरून वादावादी दिसून आली. उत्तर नागपुरात आपल्या समर्थकांना कमी जागा मिळाल्याचा आरोप करत माजी मंत्री नितीन राऊत यांनी ‘एबी फॉर्म’ सुरुवातीला नाकारले.कोणताही उमेदवार लढणार नाही, अशी त्यांनी भूमिका घेतली. अखेर काही नेत्यांच्या मध्यस्थीनंतर ते ‘एबी फॉर्म’ घेऊन गेले. मात्र संबंधित प्रभागात कुठलाही धोका नको म्हणून २ असा क्रमांक लिहून १२ ते १४ उमेदवारांना नव्याने ‘एबी फॉर्म’ देण्यात आले.
नितीन गडकरींच्या घरासमोर शक्तिप्रदर्शन
By admin | Published: February 04, 2017 2:27 AM