- यदु जोशी मुंबई : महावितरणला वीजपुरवठा करणा-या राज्यातील १४ औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये चार-सहा दिवस पुरेल एवढाच कोळसा असल्याने वीजनिर्मिती कमालीची संकटात आली आहे. आधीच भारनियमनाचे चटके राज्याला बसत असताना वीजनिर्मितीला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.वीज निर्मिती प्रकल्प आणि त्यांच्याकडे किती दिवसापुरता कोळसा साठा उपलब्ध आहे त्याची आकडेवारी अशी - अमरावती ६, भुसावळ ३, बुटीबोरी १, चंद्रपूर १०, डहाणू २, धारीवाल ०, जीएमआर वरोरा ५, खापरखेडा ८, कोराडी ४, मौदा ०, नाशिक ६, पारस ३, परळी ४, तिरोडा १. या प्रकल्पांमध्ये महानिर्मिती आणि खासगी अशा दोन्हींचे वीज प्रकल्प आहेत. येत्या दोन-चार दिवसांत कोळसा मिळाला नाही, तर वीजनिर्मितीत घट होणार असल्याने वीजभारनियमन वाढण्याची शक्यता आहे.वीजभारनियमनामुळे महाविरतण आणि महानिर्मितीमध्ये एकमेकांवर आरोप करणे सुरू झाले आहे. कोळसासाठ्याचे नियोजन महानिर्मितीने नीट केले नाही, असे महावितरणचे म्हणणे आहे; तर महावितरणने विजेच्या गरजेबाबत अद्ययावत आणि अचूक माहिती दिली नसल्याचे महानिर्मितीचे अधिकारी सांगत आहेत. कोळसा कंपन्यांकडून कोळशाचा पुरवठा जवळपास बंद झाला आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय ऊर्जा व कोळसा मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा करून तत्काळ कोळसा पाठविण्याची विनंती केली आहे. महावितरणने आज खुल्या बाजारातून ४०० मेगावॅट वीज विकत घेत भारनियमनावर मात करण्याचा प्रयत्न केला.भारनियमनामुळे कर्जमाफीचे आॅनलाइन फॉर्म अडचणीतराज्याच्या अनेक भागांत वीज भारनियमन होत असल्याने कर्जमाफीसाठी शेतकरी आॅनलाइन अर्ज भरू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. १५ सप्टेंबर ही सदर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे ही तारीख वाढविली नाही, तर अनेक शेतकरी अर्ज भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
वीजनिर्मिती संकटात, भारनियमन वाढणार : चार दिवस पुरेल एवढाच कोळसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 4:12 AM