शौकत शेख। लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू : येथील समुद्रकिनारपट्टीवरील चिंचणी, वरोर, वानगाव, साखरे या फिडरअंतर्गत येणाऱ्या सुमारे ४० गावात गेला आठवडाभर वीज गुल आहे. खेडोपाडयात वीज महावितरण विभागाचा भोंगळ व गलथान कारभारामुळे येथील वीज पुरवठा सातत्याने खंडीत होत असल्याने येथील हजारो ग्रामस्थांबरोरच वीजेवर अवलंबून असलेले लहान मोठे व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांवर उपासमारीची वेळ आली आहे. झपाट्याने लोकसंख्या वाढत असलेल्या बंदरपट्टी भागांतील गावातल्या वीज वितरण यंत्रणेच्या देखभाल दुरूस्तीकडे महावितरणने दुर्लक्ष केल्याने गेल्या तीन महिन्यांपासून हलक्या वाऱ्याने जिर्ण व जुनाट झालेल्या वीजेच्या तारा तुटण्याचा प्रकारात वाढ झाल्याने रस्त्यातून ये-जा करणाऱ्या तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे.डहाणूच्या पश्चिम किनारपट्टी वरील गावांत गेल्या पन्नास वर्षापूर्वी वीज पुरवठा सुरू झाला. तेव्हा पासून आजतागायत विजेच्या तारा, लोखंडी खांब, ट्रान्सफार्मर तसेच इतर साहित्य बदलण्यात न आल्याने येथील वीज पुरवठ्याची अवस्था दयनीय झाली आहे. दिवसभर विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले आहेत. रात्री, बेरात्री वीज पुरवठा खंडीत झाल्यावर येथील तरूण मंडळी एकत्र येऊन जीव धोक्यात घालून फ्यूज, डिओ टाकून वीजपुरवठा सुरळीत करीत असतात. विशेष म्हणजे विशेष म्हणजे त्यासाठी लागणारे पैसे ग्रामस्थच वर्गणी करून गोळा करतात. दुकानातून तांब्याची तार विकत घेऊन ठेवत असतात. अशी दयनीय अवस्था असतांनाही महावितरण कंपनी संबधित कार्यालयाला अपुरा साहित्य पुरवठा करीत असल्याने अव्वाच्या सव्वा बिले भरणाऱ्या ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक होण्याची चिन्हे दिसत आहेत. डहाणूच्या बंदरपट्टी भागात मोठया प्रमाणात डायमेकिंगचा व्यवसाय असून सुमारे पंचवीस ते तीस हजार कुशल अकुशल कारागीर रात्रंदिवस काम करून उदरनिर्वाह करीत असतात. परंतु दिवसातून दहा पंधरा वेळा वीजपुरवठा खंडीत होत असल्याने या कारागीरांना हतावर हात ठेऊन बसावे लागते. >सामग्रीची कमतरता३० मे रोजी बोईसर येथे बिघाड झाल्याने बारा तास वीज पुरवठा खंडीत झाल्याने भर उन्हाळयात नागरिकांचे हाल झाले. तर चिंचणी, वरोर, वाणगांव, वाढवण, डहाणूखाडी इ. भागांत दररोज वीजेच्या तारा तुटून पडत असल्याने दोन, तीन तास नागरिकांना अंधारात काढावे लागले. पावसाळा सुरू झाला असला तरी पुरेशा प्रमाणात विजेच्या तारा, फ्यूज, झंपर, डिओ इत्यादी बदलण्यात न आल्याने या भागत काळोख पसरतो आहे. वसई येथील महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांनी या भागाची पाहणी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पं.स.सदस्य वसीदास अंभिरे यांनी दिला आहे.
चाळीस गावांतील वीज गुल
By admin | Published: June 05, 2017 3:04 AM