दावडी : शिवसेनेच्या मदतीने अपक्ष नगरसेवकांनी राजगुरुनगर नगर परिषदेत सत्ता स्थापन करण्यात यश मिळवत सत्ता स्थापन केली. आज (दि.१६) झालेल्या नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अध्यक्षपदी अपक्ष नगरसेवक बापू किसन थिगळे यांची तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या सारिका गणेश घुमटकर या निवडून आल्या़ राजगुरुनगर नगरपरिषदेत शिवसेनेशी युती झाल्याचा दावा आमदार बाळा भेगडे यांनी केला होता़ पण, त्याला वरिष्ठांकडून प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी शिवसेनेने अपक्षांना हाताशी धरत बाजी मारली़ राजगुरुनगर नगर परिषदेच्या अध्यक्ष- उपाध्यक्षपदाची निवडणूक आज शनिवारी नगर परिषदेच्या सभागृहात झाली. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी अपक्ष नगरसेवक बापू थिगळे, किशोर ओसवाल यांनी तर भाजपाच्या वतीने नगरसेवक शिवाजी मांदळे, अपक्ष नगरसेवक सुरेखा क्षोत्रीय यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. या निवडणुकीतून अपक्ष नगरसेवक सुरेखा क्षोत्रीय, किशोर ओसवाल यांनी माघार घेतली होती. नगराध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली यामध्ये अपक्ष नगरसेवक थिगळे यांना १० मते तर शिवाजी मांदळे यांना ८ मते पडली. यामध्ये नगराध्यक्षपदी बापू थिगळे निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी हिम्मतराव खराडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत आवटे यांनी जाहीर केले. यानंतर लगेचच उपाध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. उपाध्यक्षपदासाठी भाजपाच्या संपदा अमोल सांडभोर यांनी तर शिवसेनेकडून सारिका गणेश घुमटकर यांनी उमेदवारी अर्ज भरले. यावर निवडणूक घेण्यात आली. यामध्ये सारिका घुमटकर यांना दहा मते तर संपदा सांडभोर यांना ८ मते मिळाली. सारिका घुमटकर या उपाध्यक्षपदी निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले. हात वर करून मतदान घेण्यात आले. या निवडणुकीसाठी सर्व नगरसेवक उपस्थित होते. निवडणुकीच्या निकालापासून सहलीला गेलेले नगरसेवक आज नगराध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी वाजतगाजत या निवडणुकीसाठी आले. या अपक्ष नगरसेवकांना घेऊन माजी जि़ प़ सदस्य अनिल राक्षे, शिवसेनेचे तालुका प्रमुख गणेश सांडभोर, माजी तालुका प्रमुख सुरेश चव्हाण, खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती कैलास सांडभोर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष वैभव घुमटकर, अमृता गुरव, आदी शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते निवडणूकस्थळी घेऊन आले. निवडीनंतर नगराध्यक्ष बापू थिगळे, उपनगराध्यक्ष सारिका घुमटकर यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. (वार्ताहर)४राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच अपक्ष नगरसेवक सहलीला गेल्याने या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवसेनेचे दोन नगरसेवक तटस्थ असल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष होते. या निवडणुकीत भाजपकडे सत्ता येण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट, मावळचे आमदार बाळा भेगडे हे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, विद्यमान आमदार सुरेश गोरे यांच्या संपर्कात होते. राजगुरुनगर नगरपरिषदेत भाजप शिवसेनेची सत्ता येण्यासाठी भाजप कडून मोठे प्रयत्न केले जात होते. मात्र वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला नाही. यामुळे भाजपला यात अपयश आले. ४दुसरीकडे भाजपाचे युवा नेते अतुल देशमुख यांचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सुरेश गोरे, माजी आमदार दिलीप मोहिते यांनी अगोदरपासून प्रयत्न सुरूठेवले होते. त्यांनी अपक्ष नगरसेवकांच्या मागे ताकद उभी केली होती. कोणत्याही परिस्थितीत भाजपाला सत्तेवर येऊ द्यायचे नाही यासाठी तालुक्यातील अतुल देशमुखविरोधी गटाच्या नेत्यांचे जोरदार प्रयत्न सुरू होते.४उपाध्यक्षपदासाठी भाजपाच्या संपदा अमोल सांडभोर यांनी तर शिवसेनेकडून सारिका गणेश घुमटकर यांनी उमेदवारी अर्ज भरले. संपदा सांडभोर यांना ८ मते मिळाली.
राजगुरुनगरमध्ये अपक्षाच्या हाती सत्ता
By admin | Published: May 16, 2015 11:16 PM