बारामती : देशात सत्तेचा गैरवापर केला जात आहे. अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा अपेक्षित होती. परंतु विरोधकांना बोलूच द्यायचे नाही, अशी केंद्र सरकारची भूमिका आहे. आजपर्यंत असे चित्र कधी पाहिले नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली.बारामतीत येथे शनिवारी पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. पवार म्हणाले, लोकप्रतिनिधींना हतबल करण्यासाठी सरकार काम करत आहे.
न्यायालयाने अनिल देशमुख, संजय राऊत यांना जामीन दिला. त्यातून राज्यातील सत्ताधाऱ्यांनी काही शिकलं पाहिजे. सत्तेचा गैरवापर केला जात आहे. काही सदस्य आत आहेत. त्यांनाही न्याय मिळेल. जामीन मिळणे हा हक्क आहे. ज्या कारणाने या लोकांना आत टाकले होते, त्यात फारसे काही दिसत नाही, हा निष्कर्ष न्यायालयाने काढला आहे. त्यामुळे सत्तेचा गैरवापर करून गेल्या काही महिन्यांपासून लोकप्रतिनिधींना डाऊन करण्याचे काम केले जात आहे.
न्यायालयाच्या निर्णयामुळे सरकारचा दृष्टिकोन चुकीचा असल्याचे दिसून आले आहे. केंद्राचे १ फेब्रुवारीला बजेट सादर होणार आहे. त्यात सरकारची नीती काय, हे दिसून येईल. देशाचा विचार करून संसदेची प्रतिष्ठा लक्षात घेऊन सरकारने पावले टाकावीत, असेही पवार म्हणाले.
अर्थव्यवस्थेच्या मजबुतीसाठी प्रयत्न आवश्यकशेतकरी ज्या दिवशी यशस्वी होईल, त्या दिवशी व्यापार आणि उद्योग क्षेत्राला चांगले दिवस येतील. सत्ता कुणाची असली तरी देशाची अर्थव्यवस्था सुधारली पाहिजे आणि भारत हा एक उत्तम निर्यातदार देश म्हणून पुढे यायला पाहिजे. राजकीय मतभेद बाजूला सारून अर्थव्यवस्थेच्या मजबुतीसाठी राजकीय हेवे दावे बाजूला ठेवून अर्थव्यवस्थवर काम करण्याची गरज आहे, मात्र तसे होताना दिसत नाही, असेही शरद पवार यांनी सांगितले.