सातारा : ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय,’ असं बिरुद मिरविणाऱ्या पोलीस प्रशासनाला मानहानी पोहोचविणारी घटना बुधवारी घडूनही पोलिसांनी नांगी टाकली. वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्याला कऱ्हाड येथील भाजप पदाधिकाऱ्याने चक्क अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. लायसन्सच्या जागी पक्षाचे आयकार्ड दाखविणाऱ्या या उर्मट कार्यकर्त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे ‘सत्तेची मुजोरी अन् खाकीची हतबलता!,’ यानिमित्ताने सातारकरांना अनुभवयास आली.भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवडीसाठी बुधवारी साताऱ्यात दाखल झालेल्या या पदाधिकाऱ्याने पोवई नाक्यावरचा सिग्नल तोडला. या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्याने सिग्नल तोडून जाणारी गाडी थांबविली. त्यानंतर त्याने भाजपचा पदाधिकारी असल्याचे सांगत महिला पोलीस कर्मचाऱ्याला पक्षाचे आयकार्ड दाखवून दबाव आणला. ही गाडी तिथून निसटल्यानंतर मार्केटयार्ड येथे दाखल झाली. त्या ठिकाणीही संबंधित पदाधिकाऱ्याने वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. या प्रकारानंतर महिला कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल करण्याचा निर्णय घेतला होता; पण वरिष्ठांच्या दबावामुळे या महिला कर्मचाऱ्याला मोकळ्या हाताने परतावे लागले. संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याची तक्रार दाखल होऊ नये, यासाठी वरिष्ठ पातळीवरून चक्रे फिरल्याची जोरदार चर्चा आहे. भाजपची नेतेमंडळी अशा प्रकारे संबंधित मुजोर पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पाठीशी घालत असतील तर त्यांची मुजोरी आणखी वाढू शकते, यात शंका राहिलेली नाही. केंद्रात व राज्यात सत्ता असल्याने काही पदाधिकारी शासकीय यंत्रणेला नेहमीच वेठीस धरत असल्याचे चित्र असते. इथे तर चक्क पोलीस यंत्रणेला वेठीस धरण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे ही मुजोरी आणखी वाढल्यास कायदा मोडणाऱ्यांचे राज्य येईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)पोलीस कायद्याचे रक्षण करण्यासाठी काम करत असतात. त्यांचा सगळ्यांनीच आदर करायला हवा. अत्यंत ताणतणावाच्या परिस्थितीत आपले वैयक्तिक प्रश्न बाजूला ठेवून पोलीस सेवा बजावतात. सत्तेतला असो सत्तेबाहेरचा कुठल्याही पदाधिकाऱ्याने आरेरावी करून पोलिसांशी बोलले नाही पाहिजे. ती केली गेल्यास ज्यांचे आपण नेतृत्व करतो, त्या जनतेने काय बोध घ्यायचा?- चंद्रकांत जाधव, उपजिल्हा प्रमुख, शिवसेना सत्तेवर असलेल्यांचे हेच ‘अच्छे दिन’ लोकांबरोबरच शासकीय यंत्रणेलाही भोगायला लागत आहेत. या व्यतिरिक्त मी जास्त काही बोलू इच्छित नाही.- आमदार आनंदराव पाटील, जिल्हाध्यक्ष, काँगे्रसप्रकरण रफादफा!पोलिसांकडे डोळे वटारून पाहण्याची हिम्मतही कोणी करत नव्हते, ते दिवस आता भाजप शासनाच्या काळात इतिहासजमा झाल्याचे चित्र आहे. डोळे वटारणे सोडा, इथे तर चक्क पोलिसांना शिवीगाळ केली जात आहे. पोलिसांशी पंगा घेणाऱ्यांची पोलीस कोठडीत काय अवस्था होते? याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे; पण तक्रारच दाबून गुन्हा करणाऱ्याला अभय देण्याच्या प्रकारामुळे पोलिसांचा वचक कमी होण्याची परिस्थिती उद्भवण्याची चिन्हे आहेत.
सत्तेची मुजोरी अन् खाकीची हतबलता!
By admin | Published: January 14, 2016 11:46 PM