मुंबई - अवघ्या सात दिवसांत ६५ वीजखांब आणि एक वितरण रोहित्राची वीजयंत्रणा उभारत महावितरणने पुण्यातील तालुका वेल्हे येथील अतिदुर्गम भागातील चांदर गावासह लगतच्या दोन वस्त्यांमध्ये वीज पोहचवली आहे. केवळ एका विद्यार्थ्यांसाठी डोंगरदऱ्यातून अडीच-तीन तास प्रवास करून चांदर येथील शाळेत विद्यार्जन करणारे शिक्षक रजनीकांत मेंढे यांच्यामुळे चांदरची माहिती प्रसिद्धीमाध्यमांद्वारे जगाला मिळाली होती. त्या शाळेलाही नवी वीजजोडणी देण्यात आली आहे.चांदरमध्ये अठरा घरे आहेत. बाजूलाच टाकेवस्ती आणि डिगेवस्ती असा ४६ घरांचा परिसर आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांना प्रसिद्धीमाध्यमांद्वारे चांदर गावाची माहिती मिळाली. यावर येथे वीजपुरवठा करण्यासाठीचे निर्देश त्यांनी दिले. त्यानुसार, २० एप्रिलला काम सुरु झाले. साठ कर्मचारी वीजयंत्रणा उभारण्याच्या कामी लागले. सकाळी नऊ ते रात्री उशिरापर्यंत वीजयंत्रणा उभारण्यासाठी काम सुरु होते. सलग सात दिवसांच्या कामानंतर २६ एप्रिलला वितरण रोहित्र व उच्चदाब वाहिनी कार्यान्वित झाली; आणि येथे वीज पोहचली.वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर पहिल्याच दिवशी चांदर गाव व दोन वस्त्यांमध्ये प्रत्येकी दोन नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या. यात चांदरमधील प्राथमिक शाळेसह वीजग्राहक दिनाराम सांगळे यांनी पहिल्या वीजजोडणीचा मान मिळविला. टाकेवस्ती येथे बबन सांगळे, तुकाराम बेसावडे यांना तर डिगेवस्ती येथील नथू कोकरे व तिमा कोकरे यांना नवीन वीजजोडणी देण्यात आल्या आहेत. दरम्यान, येथे वीजयंत्रणा उभारण्यासाठी महावितरणला सुमारे वीस लाख रुपये खर्च आला असून, चांदर गाव व दोन्ही वस्त्यांमध्ये ४६ पैकी बहुतांश घरे ही कुडाच्या मातीने लेपलेली असल्यामुळे वीजमीटर व सर्व्हीस वायर टाकण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे.पहिल्याच दिवशी चांदर गाव व दोन वस्त्यांमध्ये प्रत्येकी दोन नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या. यात चांदरमधील प्राथमिक शाळेसह वीजग्राहक दिनाराम सांगळे यांनी पहिल्या वीजजोडणीचा मान मिळविला. टाकेवस्ती येथे बबन सांगळे, तुकाराम बेसावडे यांना तर डिगेवस्ती येथील नथू कोकरे व तिमा कोकरे यांना नवीन वीजजोडणी देण्यात आल्या.
अतिदुर्गम ‘चांदर’मध्येही पोहचली वीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 4:51 AM