मुंबई - राज्यात लागू झालेल्या राष्ट्रपती राजवटीमुळे सर्वत क्षेत्रातील कामांना खीळ बसली आहे. प्रशासकीय अधिकारी मोठे निर्णय घेऊ शकत नसल्याने कोंडी निर्माण झाली आहे. तर शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत वेळेत मिळणे दुरापास्त झाले आहे. तर विधानसभेत पहिले पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झालेल्या नवनिर्वाचित आमदारांना आपल्या शपथविधीची प्रतीक्षा लागली आहे.
या निवडणुकीत राज्यातील अनेक मतदार संघात बदल झाला आहे. जुन्या उमेदवारांना घरचा रस्ता दाखवत मतदारांनी नव्या दमाच्या नेत्यांना संधी दिली आहे. मराठवाड्यात धीरज देशमुख, संदीप क्षीरसागर, नमिता मुंदडा, कैलास पाटील, राजू नवघरे, मेघना बोर्डीकर हे पहिल्यांदाच विधानसभेला निवडून आले आहेत. मात्र हे नेते अद्याप आमदारकीच्या अधिकारांपासून वंचित आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नवनिर्वाचित आमदार नुकसानीची पाहणी करण्यासाठी फिरत आहेत. परंतु, आमदारकीचा शपथविधीच झाला नसल्याने अधिकारी आपल्या सूचनांना महत्त्व देतीलच याची खात्री नाही, असं या आमदारांचे म्हणणे आहे. वास्तविक पाहता जनतेचे प्रश्न विधीमंडळात उपस्थित करून ते सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणे अपेक्षीत होते. मात्र सरकारच स्थापन झाले नसल्यामुळे दाद मागायची तरी कोणाला असा प्रश्न उपस्थित असल्याची भावना आमदार बोलून दाखवत आहेत.
दरम्यान आमदाराला पाच वर्षांचा कालावधी मिळतो. मात्र राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने त्यातील सहा महिने काम न करता जातात की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. एकूण नवनिर्वाचित आमदारांसह दिग्गज नेत्यांनाही राष्ट्रपती राजवटीमुळे हातावर हात ठेवून बसावे लागत आहे.