कोल्हापूर : प्रादेशिकतेचा विचार करणारी मंडळी सत्तेवर आहेत. त्यामुळे शासन काही भागापुरतेच निर्णय घेताना दिसत आहे. हे राज्याच्या एकसंधतेच्या हिताचे नाही, असे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी सोमवारी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. पवार म्हणाले, सत्ताधारी विरोधी बाकांवर होते, तेव्हा त्यांनी स्वतंत्र विदर्भाची मागणी उघडपणे केली होती. आता प्रादेशिक विचार करूनच अनेक निर्णय होत आहेत. संयुक्तमहाराष्ट्रासाठी १०५ जणांनी हौतात्म्य पत्करले, असा इतिहास असताना प्रादेशिक विचार करणे बरोबर नाही. संकुचित दृष्टिकोन ठेवून विकास साध्य होत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे भाव कमी आहेत, म्हणूनच देशातील कारखाने साखर निर्यात करण्यास उत्सुक नाहीत, असेही ते म्हणाले. नागरी बँकांना केंद्राच्या मदतीची गरज खासगी बँकांप्रमाणे नागरी सहकारी बँकांनाही केंद्र सरकारने मदत करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पवार यांनी येथे केले. रिझर्व्ह बँकेने नागरी बँकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.कोल्हापूर अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेच्या शताब्दी सांगता सोहळ्यात पवार म्हणाले, केंद्र अडचणीत सापडलेल्या सहकारी व मोठ्या खासगी बँकांनाही मदत करते. मात्र, समाजातील दुबळ्या घटकांना कर्जपुरवठा करणाऱ्या नागरी सहकारी बँकांना कोणतीही मदत केली जात नाही. रिझर्व्ह बँकेची धोरणे सहकारी बँकांना अडचणीत आणण्यासाठीच आहेत का, अशी शंका येते. सहकारी बँकांना बळ देण्यासाठी केंद्र सरकार बदलले पाहिजे, असे पवार म्हणाले.
प्रादेशिकतेला महत्त्व देणारे राज्यात सत्तेवर
By admin | Published: January 19, 2016 3:46 AM