अमरावती - एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ३९ हून अधिक आमदारांनी बंड केल्याने राज्यात अभूतपूर्व असा राजकीय पेच निर्माण झाला आहे. त्यातच राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांना दिल्याने राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारचे काऊंटडाऊन सुरू झालं आहे. ठाकरे सरकार अस्थिर झाले असतानाच भाजपाने नवे सरकार स्थापन करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यात अशाप्रकारे सत्तासंघर्ष जोरात सुरू असताना दुसरीकडे राज्याच्या विधानसभेतील एक अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांचा साखरपुडा संपन्न झाला आहे.
अमरावतीमधील वरुड-मोर्शी मतदारसंघातील आमदार देवेंद्र भुयार यांचा साखरपुडा अगदी थाटामाटात संपन्न झाला आहे. आता देवेंद्र भुयार हे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे राज्याचा सत्तासंघर्षाचा शेवट काही होवो, देवेंद्र भुयार यांनी मात्र आपलं संसाररूपी सरकार स्थापन करण्याचा दिशेने एक पाऊल पुढे टाकलंय, अशी राजकीय वर्तुळाच चर्चा आहे.
देवेंद्र भुयार हे तरुण नेते शेतकरी चळवळीतून पुढे आले आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवत ते विजयी झाला होते. त्यांनी तेव्हाच्या भाजपा सरकारमधील कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या पराभव केला होता.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार पडल्यानंतर संजय राऊत यांनी देवेंद्र भुयार यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर देवेंद्र भुयार यांनीही राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार जुगलबंदी रंगली होती.