ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 26 - पश्चिम महाराष्ट्रात थकीत वीजबिलांचा भरणा न करणार्या 75,109 ग्राहकांचा वीजपुरवठा 32 कोटी 84 लाखांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची महावितरणची धडक मोहीम तीव्र झाली असून, गेल्या 23 दिवसांत ही कारवाई करण्यात आली आहे.वीजबिलांच्या थकबाकीचे प्रमाण वाढल्यास महावितरणला आर्थिक प्रश्नांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरमहा वीजबिलांसह वीजग्राहकांकडे असलेल्या थकबाकीची वसुली करण्यासाठी मोहीम राबविण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी दिले आहेत. त्यानुसार पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर व सातारा या पाचही जिल्ह्यांत थकीत वीजबिलांच्या वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र झाली आहे. यात वारंवार आवाहन करूनही थकीत वीजबिल न भरणार्या 75,109 थकबाकीदारांचा वीजपुरवठा गेल्या 23 दिवसांत खंडित करण्यात आला आहे. या ग्राहकांकडे 32 कोटी 84 लाख रुपये थकीत आहेत.लघुदाब घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांविरुद्ध सुरू असलेल्या धडक कारवाईत (थकबाकी) पुणे जिल्हा - 36,105 (23 कोटी 43 लाख), कोल्हापूर जिल्हा - 9,794 (2 कोटी 57 लाख), सांगली जिल्हा - 5,187 (94 लाख 88 हजार), सोलापूर जिल्हा - 19,124 (4 कोटी 54 लाख) तर सातारा जिल्ह्यात 4,899 ग्राहकांचा (1 कोटी 35 लाख) वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.वीजपुरवठा खंडित करण्याची थकबाकीदारांनी कटू कारवाई व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकीत देयकांचा त्वरित भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. थकबाकीदारांविरोधात सुरू असलेली धडक मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. वीजबिलांबाबत ग्राहकांच्या तक्रारी असल्यास त्याचे त्वरित निराकरण करण्यात येणार आहे. थकीत वीजबिलांचा भरण्यासाठी स्थानिक वीजबील भरणा केद्गांसह व घरबसल्या ऑनलाईन पेमेंटसाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच Mahavitaran App या मोबाईल अॅपचा पर्याय उपलब्ध आहे.एकाच दिवशी साडे सहा हजार थकबाकीदारांची वीज खंडितथकीत वीजबिलांपोटी वीजपुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेत शुक्रवारी, 23 रोजी पश्चिम महाराष्ट्रातील 6,435 थकबाकीदारांचा वीजपुरवठा 86 लाख 71 हजार रुपयांच्या थकीत बिलांपोटी खंडित करण्यात आला. शून्य थकबाकीच्या संकल्पनेनुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचार्यांसह मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता दर्जाचे वरिष्ठ अधिकारी व त्यांचे स्वतंत्र पथकेही या धडक मोहिमेत सहभागी झाले आहेत. खंडित करण्यात आलेल्या वीजजोडणीतून थकीत वीजबिलाचा भरणा न करता वीजवापर होत असल्यास संबंधित ग्राहकाविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.