मुंबई : पाण्याअभावी पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शासनाने शेतकऱ्यांना ८ तासांऐवजी १२ तास वीजपुरवठा करण्याचे आदेश महावितरणला दिले आहेत. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना १२ तास वीजपुरवठा दिला जात असून, त्यासाठी महावितरणच्या यंत्रणेत आवश्यक ते बदल करण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांना योग्य प्रकारे वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणने क्षेत्रीय अभियंत्यांना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.मागील दोन-तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिके करपण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल शासनाने घेतली असून, पाण्याची आणि विजेची उपलब्धता असल्यामुळे कृषी फिडरवरील शेतकऱ्यांना ८ तासांऐवजी १२ तास वीजपुरवठा करण्याचे आदेश महावितरणला दिले आहेत. त्यानुसार या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राज्यातील कृषिप्राबल्य असलेल्या १६पैकी १३ परिमंडलांत कृषिग्राहकांना दरदिवशी १२ तास चक्राकार पद्धतीने थ्रीफेजची वीज उपलब्ध करून देण्यात येत आहे. याबाबत महावितरणने क्षेत्रीय मुख्य अभियंत्यांना निर्देश दिले असून, त्यात तांत्रिक कारणांमुळे कुठे वीजपुरवठा करताना अडचणी आल्यास त्या तातडीने दूर करून १२ तास वीजपुरवठा मिळेल याची दक्षता घेण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
वीजपुरवठा बारा तास होणार अंमलबजावणीचे आदेश
By admin | Published: September 10, 2016 5:01 AM