विशेष प्रतिनिधी ।मुंबई : सलग ५० वर्षांची संसदीय कारकिर्द गाजवणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आजवर राज्याला जी दिशा दिली, त्याच दिशेने सरकारची वाटचाल सुरू आहे. जलयुक्त शिवार, शेतीला सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न, पायाभूत सूविधा उभ्या करण्यासाठी समृद्धी महामार्ग या मागे त्यांच्याच विचाराची प्रेरणा आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी कृषिमंत्री शरश्चंद्र पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विधिमंडळात त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. पवार यांच्या भाषणाचे अनेक दाखले देत मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारची वाटचाल त्यांच्याच दिशेने कशी सुरू आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला.विदर्भात कारखाने आणायचे असतील तर नागपूर ते मुंबई पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत, असे पवार यांनी १९८२ साली आपल्या भाषणात सांगितले होते. पवारांच्या त्याच संकल्पनेवर आम्ही समृद्धी मार्गाचे काम सुरू केले आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या अनुशेषाबद्दल पवार जे काही बोलले होते त्या वेळी त्यांनी जे विचार मांडले होते ते मूलभूत विचार आहेत आणि आम्ही त्याच विचाराने या दोन भागांतील अनुषेश दूर करण्याचे काम करत आहोत, असेही ते म्हणाले. विदर्भात वीज तयार करण्याचे प्रकल्प उभे राहिले; पण त्यांना कारखाने म्हणून पाहता येणार नाही, कारण विदर्भात तयार होणारी वीज सगळे राज्य वापरते आणि तोच विदर्भ २ टक्केसुद्धा वीज वापरत नाही, हे निरीक्षण स्वत: शरद पवार यांनी नोंदवले होते, याकडेही फडणवीस यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.आम्ही सूक्ष्म सिंचनाखाली शेती आणण्याचा प्रयत्न करतोय. तीदेखील त्यांचीच कल्पना आम्ही अमलात आणली, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी पवारांचे भाषण वाचून दाखवले. मुख्यमंत्र्यांनी या अभिनंदन ठरावाचा पुरेपूर राजकीय वापर करून घेताना पवारांनी लोकसंख्या वाढीच्या अनुषंगाने व्यक्त केलेले विचारही वाचून दाखवले.मुख्यमंत्री असताना पवारांनी केलेला मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार, राज्य महिला आयोगाची स्थापना आणि संस्थांत्मक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेखही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
पवारांनी दाखविलेल्या दिशेनेच राज्याची वाटचाल, मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 1:48 AM