सुरेश हाळवणकर यांना तीन वर्षे कारावास इचलकरंजी (जि़ कोल्हापूर) : यंत्रमाग कारखान्यातील वीजमीटरमध्ये फेरफार करून २० लाख ८७ हजार रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार सुरेश हाळवणकर व त्यांचे बंधू महादेव यांना जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. ए. शहापुरे यांनी दोषी ठरविले. न्यायालयाने दोघांनाही तीन वर्षे कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने शिक्षा सुनावल्याने वीजचोरीने सुरेश हाळवणकर यांची आमदारकी जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे़ हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथे हाळवणकर बंधूंचा गणेश उद्योग समूह नावाचा यंत्रमाग कारखाना आहे. २००८ मध्ये महावितरणच्या भरारी पथकाने कारखान्यावर छापा टाकला. त्यावेळी केलेल्या तपासणीमध्ये विजेच्या मीटरमध्ये फेरफार केल्याचे निष्पन्न झाले. मीटरची प्रयोगशाळेत तपासणी केली असता, ते ४५ टक्के हळू फिरत असल्याचे निदर्शनास आले म्हणून भरारी पथकाने २० लाख ८७ हजार रुपयांची चोरी झाल्याचे म्हटले.आमदार हाळवणकर व महादेव या दोघांवरही वीजचोरीचा गुन्हा नोंद होऊन जिल्हा न्यायालयात खटला दाखल झाला. गणेश उद्योग समूहाचे व्यवस्थापक महादेव हाळवणकर आहेत. तो ते चालवीत असल्याने खटल्यातून आपल्याला वगळावे, अशी भूमिका आमदार हाळवणकर यांनी न्यायालयात घेतली आणि या खटल्यातून आपल्याला वगळावे, अशी विनंती त्यांनी न्यायालयास केली होती; पण न्यायालयाने ती फेटाळली होती.न्यायालयात झालेल्या सुनावणीत महावितरण कंपनीतर्फे ए. एम. जमादार व जालिंदर शेटे यांचे जबाब झाले. दोघांनीही वीजमीटरमध्ये फेरफार केल्याचे सांगितले. तसेच तपासणी अहवालही सादर केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत उपरोक्त शिक्षा सुनावली. महावितरणतर्फे ॲड. उज्ज्वला पवार यांनी व हाळवणकर यांच्यावतीने ॲड. एस. सी. करंदीकर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)-----या निकालाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.- आमदार सुरेश हाळवणकर
वीजचोरीने जाणार आमदारकी
By admin | Published: May 04, 2014 12:42 AM