पिंपरी : आकुर्डी-निगडी-प्राधिकरणातील चार प्रमुख चौकांमध्ये राजकीय पक्षांची दहीहंडी साजरी झाली. यासाठी आयोजकांनी चौकाच्या परिघातील परिसरात पक्षाचे झेंडे लावून राजकीय वातावरण निर्माण केले होते. यामुळे चारही चौकांतील, तसेच शहराच्या अन्य भागातील दहीहंडीला राजकीय रंग प्राप्त झाला होता.आकुर्डी-प्राधिकरणातील संभाजी चौकात पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेचा भगवा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. चित्रपट कलावंतांची उपस्थिती हे प्रमुख आकर्षण होते. स्थानिक कलाकारांचा नृत्याविष्काराचा कार्यक्रम झाला. या पुढच्या भेळ चौकात भारतीय जनता पार्टीची दहीहंडी दिसून आली. रोप मल्लखांंबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. काचघर चौकात राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचे झेंडे लावुन दहीहंडी साजरी केली. तर काही अंतरावर पुढे भक्ती-शक्ती चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दहीहंडीचा उत्साह दिसून आला. बिजलीनगरपासून ते भक्ती-शक्तीपर्यंतच्या रस्त्यावर चार चौक येतात. हा प्रत्येक चौक दहीहंडीसाठी चार वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी व्यापला होता. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दहीहंडी उत्सव साजरा केला. यामुळे गुरुवारी सायंकाळी चारही चौकांत वाहतूककोंडी झाली होती. महापालिका निवडणूक जवळ आल्याने शक्तिप्रदर्शनाच्या उद्देशाने राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कोणतीही कसर सोडली. जणू काही त्यांच्यात अटीतटीची स्पर्धा सुरू असल्याचे भासत होते. प्रत्येक चौकात दहीहंडीनिमित्ताने राजकीय पक्षाचे मोठे झेंडे, पक्षश्रेष्ठींच्या छायाचित्रांसह मोठे होर्डिंग्स, रस्त्याच्या मध्यभागी असणाऱ्या दुभाजकाच्या बाजूला पक्षाचे झेंडे, फुगे, चौकाच्या मध्यभागी पताका लावून वातावरण निर्मिती करण्यात आली होती. प्रत्येक चौकात विविध पक्षांच्या दहीहंडी एकाचढ एक असल्याने नागरिकांची सायंकाळ मनोरंजनाची ठरली. (प्रतिनिधी)>एक गाव एक गणपती अशी संकल्पना राबविण्याकरिता उपदेशाच्या गप्पा मारणाऱ्या कार्यकर्त्यांची सामाजिक उपक्रम, पांरपरिक सण, उत्सवातील कृती दखल घेण्यासारखी आहे. बोलायचे एक, करायचे एक, ही त्यांची वृत्ती दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने नागरिकांना लक्षात आली. दहीहंडी उत्सवात कोण बाजी मारणार, अशी जरी त्यांच्यात स्पर्धा असली, तरी काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीच्या दहीहंडीत कोणाची हंडी फुटणार, कोणाचे थर हंडी फोडताना कोसळणार, हे पाहावयास मिळणार असल्याची चर्चा मात्र नागरिकांमध्ये होती.
राजकीय पक्षांचे दहीहंडीतून शक्तिप्रदर्शन
By admin | Published: August 26, 2016 1:31 AM