ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 15 - दहशतवाद अन् इस्लामचा काडीमात्र संबंध नसून मुहम्मद पैगंबरविरोधी असलेल्या वहाबी विचारधारेतून संपूर्ण जगात दहशतवाद पसरविला जात आहे, असा आरोप रझा अकादमीचे संस्थापक अध्यक्ष मौलाना सईद नुरी यांनी केला. रझा अकादमीने राष्ट्रीय स्तरावर दहशतवादविरोधी अभियान हाती घेतले असून येत्या शुक्र वारपासून भारतभरातील सुन्नी पंथीय धर्मगुरू मशिदींमधून दहशतवादविरोधी प्रवचन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.मालेगावमध्ये आयोजित एका धार्मिक कार्यक्रमासाठी मुंबईहुन नाशिकमार्गे सईद नुरी शुक्रवारी (दि.१५) धर्मगुरूंसह रवाना झाले. तत्पूर्वी जुने नाशिकमधील शाही मशिदीमध्ये नुरी यांनी शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी मौलाना खलीलउल रहेमान नुरी, मौलाना अमानुल्ला रझा, मौलाना हाफीज अब्दुल जब्बार, हाजी वसीम पिरजादा आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी नुरी म्हणाले, आज देशासह संपुर्ण जगात दहशतवाद्यांनी इस्लामची छबी बिघडविली आहे.जिहाद व इस्लामच्या शिकवणीचा चुकीचा अर्थ लावून वहाबी विचारधारेमार्फत प्रभावीत होऊन दहशतवाद घडवून आणला जात आहे. सौदी अरेबिया, पाकिस्तानसारखे देश दहशतवाद्यांना पोसत असून याचा सर्वात आगोदर फटका याच देशांना आतापर्यंत बसत आला आहे. मुहम्मद पैगंबर व इस्लामची शिकवण ही माणुसकीची व समानतेची आहे.पैगंबर हे सर्व विश्वासाठी कृपावंत प्रेषित म्हणून जागतिक स्तरावर ओळखले जातात; मात्र दहशतवादविरोधी विचारधारेतून माणुसकीला काळीमा फासणारे लोक पैगंबरांचे कार्य आदर्श मानत नाही. या दहशतवादी मानसिकतेचे खंडण करण्यासाठी येत्या शुक्रवारी (दि.२२) देशभरातील सुन्नी पंथीय मुस्लीमांच्या मशिदींमधून धर्मगुरू प्रवचन करणार असल्याचे नुरी यांनी सांगितले.जाकीर नाईक इस्लामविरोधीजाकीर नाईकची भडकाऊ भाषणांची शैली सर्वश्रुत आहे. २००८ साली तत्कालीन सरकारने यावर शंका घेतली मात्र कारवाई करण्यास पुढाकार घेतला नाही. सध्या पुन्हा नाईकच्या भडकाऊ भाषणांचा थेट दहशतवाद्यांच्या गटाशी संबंध असल्याचे उघड झाले असून भारत सरकारने त्याच्या भाषणाची चिकित्सा करुन कायदेशीर कारवाई तातडीने करावी, अशी मागणी रझा अकादमी करत आहे. नाईक हा भारतविरोधी व इस्लामविरोधी असल्याचे नुरी म्हणाले. मुस्लीम तरुणांनी कुराण व पैगंबरांच्या शिकवण आदर्श मानावी. पैगंबरांनी कधीही हिंसा व मानवताविरोधी कृत्य खपवून घेतलेले नाही, हे विसरु नये. दहशतवादी संघटनांपासून स्वत:सह आपला देश, धर्म, समाज सुरक्षित ठेवावा, असे आवाहन नुरी यांनी यावेळी केले.