नवी मुंबई : स्वराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रमुख राज कंधारी यांच्या आत्महत्येमागे व्यावसायिक कारण असल्याचे उघड झाले आहे. कंधारी यांच्या आतेभाऊ विपीन थापरने व्यवसायात दगाफटका केल्यामुळे होणाऱ्या हानीला तोच जबाबदार असल्याचे कंधारी यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलेले आहे. गुरुवारी कार्यालयाच्या झडतीदरम्यान ही चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली.कंधारींच्या निधनानंतर त्यांच्या आत्महत्येच्या मूळ कारणांचा शोध घेण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. घरात सापडलेल्या डायरीमध्ये जीवनात येणाऱ्या चढउताराबाबत त्यांनी खंत व्यक्त केली होती. यावरून आर्थिक चणचणीमुळे कंधारी यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. याचवेळी त्यांना व्यवसायात तोटा होण्यामागे सिडकोचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप इतर बांधकाम व्यावसायिकांनी केला होता. त्यामुळे पोलिसांपुढे तपासाचा गुंता अधिकच वाढला होता. कंधारी यांच्याविरोधात देखील आयुक्तालयासह इतर ठिकाणी विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. यामुळे कंधारींना आत्महत्येस भाग पाडणारे नेमके कारण कोणते यासंबंधीचा अधिक तपास सानपाडा पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक करीत होते. अखेर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा करण्यात सानपाडा पोलिसांना यश आले आहे. नवनियुक्त परिमंडळ एकचे उपायुक्त प्रशांत खैरे, साहाय्यक आयुक्त धनराज दायमा यांच्या पथकाने कंधारींच्या वाशी कार्यालयाची झडती घेतली. त्यामध्ये कार्यालयातील ड्रॉवरमधली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली. या चिठ्ठीमध्ये कंधारी यांनी त्यांच्या कौटुंबिक हानीला विपीन थापर यांना जबाबदार धरले असल्याचे उपायुक्त प्रशांत खैरे यांनी सांगितले. थापरने व्यवसायात दगाफटका दिल्यामुळे आपल्यावर आर्थिक संकट कोसळल्याचा उल्लेख या पत्रात केलेला आहे. (प्रतिनिधी)
आतेभावाने केला घात
By admin | Published: May 14, 2016 2:54 AM