नार्वेकरांमुळे काँग्रेसच्या प्रज्ञा सातवांचा पराभव होणार? शिंदे गटाचा मोठा दावा, असे आहे गणित...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 04:37 PM2024-07-03T16:37:49+5:302024-07-03T17:15:29+5:30
Vidhan Parishad Election News: मिलिंद नार्वेकरांच्या नावाची घोषणा करून ठाकरे गटाने चुरस आणली असली तरी याला काहीतरी घडामोडी कारणीभूत असण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी आल्याने चुरस वाढली आहे. यामुळे ११ जागा असल्या तरी १२ उमेदवार झाले आहेत. यामुळे मतांचे गणित कोण कसे जुळवणार, असा प्रश्न पडला आहे. नार्वेकरांमुळे काँग्रेसच्या किंवा शेकापच्या उमेदवाराचा पराभव होऊ शकतो, असे सुतोवाच शिंदे गटाने केले आहे. यामुळे ही निवडणूक पुन्हा एकदा रंगतदार होणार आहे.
मिलिंद नार्वेकरांच्या नावाची घोषणा करून ठाकरे गटाने चुरस आणली असली तरी याला काहीतरी घडामोडी कारणीभूत असण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे काही आमदार शरद पवारांच्या संपर्कात आहेत. शिंदे गटातही नाराजी आहे. तसेच नार्वेकरांचेही सर्वच पक्षात मित्र आहेत. यामुळे याचा मविआ फायदा उचलण्याची शक्यता आहे.
सध्याच्या संख्याबळानुसार महायुती त्यांचे ८ उमेदवार निवडून आणू शकते. तर दोन मविआ निवडून आणू शकते. तिसऱ्या उमेदवारासाठी मविआला मते जुळवावी लागणार आहेत. ही मते जुळली तरी शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नार्वेकरांमुळे प्रज्ञा सातव यांचा पराभव होऊ शकतो अशी शक्यता वर्तविली आहे. शिंदेंनी बंड करण्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. तशीच परिस्थिती नार्वेकरांच्या उमेदवारीमुळे उद्भवणार असल्याचे भाकीत सरनाईक यांनी केले आहे.
मविआचे बलाबल...
मविआच्या तीन प्रमुख पक्षांकडे ६५ आमदार आहेत. तर त्यांना पाठिंबा देऊ शकणाऱ्या अपक्ष आणि मित्र पक्षांकडे ९. तर महायुतीच्या तीन प्रमुख पक्षांकडे भाजप व छोटे मित्रपक्ष ११०, राष्ट्रवादी ४३ आणि शिवसेना ४८ असे एकूण २०१ आमदार आहेत. प्रत्येक उमेदवाराला २३ मतांची गरज आहे. हे पाहिल्यास महायुती ८ उमेदवार नक्कीच निवडून आणू शकते. परंतू, तीन उमेदवार निवडून आणण्यासाठी मविआला ४ मतांची गरज आहे. तर महायुतीला ९ वा उमेदवार जिंकविण्यासाठी ६ मतांची गरज आहे. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोण फुटतो, यावर हे गणित ठरणार आहे. नार्वेकरांनी महायुतीची मते फोडली तर महायुतीला ८ जागा जिंकता येणार आहेत.