Praful Patel News: गेल्या काही दिवसांपासून एकामागून एक गौप्यस्फोटांच्या मालिका सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्याबाबत गौप्यस्फोट केले होते. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक मोठा दावा केला आहे. एकीकडे राष्ट्रवादी कुणाची? याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी असताना दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीने उद्धव ठाकरे यांच्याकडे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मागितले होते, असे म्हटले आहे.
शरद पवार यांच्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात जास्त उलट-सुलट टीका, आरोप कोणी केले? शरद पवारांवर खालच्या स्तरावर जाऊन टीका कोणी केली? अशी टीका दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केली. तरी आम्ही त्यांच्याबरोबर सरकार स्थापन केलेच ना. सगळेजण विचारसरणीबद्दल बोलतायत, परंतु, शिवसेना आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आमच्यावर सर्वाधिक टीका कोणी केली, आम्हाला राजकारणात सर्वाधिक ज्यांनी सुनावले आम्ही त्यांच्याबरोबर सत्तेत बसलो. आम्ही त्यांच्याबरोबर का गेलो तर तिकडे सत्ता आहे म्हणूनच गेलो, असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीने अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मागितले होते
तुम्हाला एक मोठी गोष्ट सांगतो. २०१९ ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आमच्या आणि शिवसेनेच्या विधानसभेच्या जागा जवळपास सारख्याच होत्या. मला आठवतेय, शरद पवारांना विनंती केली, आपण त्यांच्याबरोबर सरकार बनवतोय, त्या दिशेने आपण पुढे गेलो आहोत. परंतु, त्यांच्याकडे ५६ आमदार आहेत आणि आपल्याकडे ५४ आमदार आहेत. तर सत्तेतील अर्धा काळ (अडीच वर्ष) आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळाले पाहिजे. आपल्या आणि शिवसेनेच्या आकड्यांमध्ये फार मोठा फरक नाही, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे काहीच बोलले नाहीत
आम्हाला सत्तेच्या अर्ध्या कार्यकाळा मुख्यमंत्रीपद हवे होते. शरद पवारांना तसे बोललो होतो. त्यावर शरद पवारांनीच मला सांगितले की तुम्ही जा आणि त्यांच्याशी बोलून घ्या. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना भेटलो. त्यांच्याशी बोललो. आदित्य ठाकरे तिथेच बसले होते. उद्धव ठाकरेंना म्हणालो, आम्हाला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद द्या. त्यावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे काहीच बोलले नाहीत, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांवर केलेली टीका, चक्की पिसायला लावू असे केलेले वक्तव्य तुम्ही विसरलात का? राजकारणात या सगळ्या गोष्टी माफ होतात का? यावर प्रफुल्ल पटेल म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या वेळी सगळे विसरलोच होतो ना, असे ते म्हणाले.