मुंबई - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी विद्यमान आमदारांनी पुन्हा संधी मिळावी म्हणून मतदारसंघ पिजून काढणे सुरु केले आहेत. गंगापूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रशांत बंब हे सुद्धा आपल्या मतदारसंघात 'थेट भेट' या उपक्रमाच्या माध्यामतून विविध गावात जाऊन गावकऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहे. मात्र आगरवाडगावात त्यांची बैठक सुरु असताना प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्याने झाप -झापले असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गेल्या दहा वर्षात तुम्ही काय काम केली असा सवाल सुद्धा त्याने यावेळी उपस्थितीत केला.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार बंब यांनी मतदारसंघातील ग्रामीण भागात दौरे सुरु केली आहे. ठीक-ठिकाणी ते बैठका घेत असल्याचे पहायला मिळत आहे. मात्र त्यांच्या अशाच एक बैठकीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, ज्यात प्रहार संघटनेचा भाऊसाहेब शेळके नावाचा कार्यकर्ता त्यांच्यावर टीका करत असल्याचे दिसत आहे. भाजप सरकारने १५ हजार रुपयाची शेतकऱ्यांना मदत करतो म्हणून आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र खात्यावर फक्त २ हजार जमा करण्यात आल्याचा आरोप या कार्यकर्त्याने यावेळी केला. निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही चार महिने मतदारसंघात दिसतात असे म्हणत आमदार बंब यांना या कार्यकर्त्याने चांगलचं झापलं. याबाबत आमदार बंब यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी फोन न उचलल्याने त्यांची प्रतिकिया मिळू शकली नाही.
नुकतेच पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांना गावकऱ्यांनी, आचारसंहितामुळे नुसते उद्घाटन करू नका म्हणत विरोध केला होता. आता बंब यांना भर सभेत काय कामे केली याचा लेखाजोखा मागितला. त्यामुळे निवडणुकीच्या अनुषंगाने मते मागायला जाणाऱ्या लोकप्रतिनिधींनी मतदार पाच वर्षाचा हिशोब मागत असल्याने त्यांची मोठी अडचण होत आहे.