Prakash Ambedkar Uddhav Thackeray: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील सीमेलगतच्या काही गावांवर दावा सांगणारे ट्विट केले. त्यांनी केलेल्या ट्विटवर खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत जाहीर खुलासा केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी तसे ट्विट केलेले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हे ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते का आणि ती व्यक्ती नक्की कोण आहे, यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ते वादग्रस्त ट्विट सीएम बोम्मईंच्या अकाऊंटवर का करण्यात आले आणि ट्विटर अकाऊंट हॅक झाले आहे हे सांगायला बोम्मईंना दिल्लीतल्या बैठकीची वाट का पाहावी लागली, असा रोखठोक सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. पण आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी हातमिळवणी करण्याच्या विचारात असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले आहे.
एकनाथ शिंदे यांचे बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोर नव्याने पक्षबांधणी करण्याचे आव्हान आहे. त्यानुसार ते विविध पक्षांशी आणि संघटनांशी काही मुद्द्यांच्या आधारावर हातमिळवणी करताना दिसत आहेत. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार अशी चर्चा मध्यंतरी रंगली होती. वंचित बहुजन आघाडी शिवसेनेच्या ठाकरे गटाला पाठिंबा देणार असे खुद्द प्रकाश आंबडेकर यांनी सांगितले. पण सीमावादाच्या मुद्द्यावरून त्यांनी शिवसेना उबाठा गटाचे मित्रपक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीवर तोफ डागली आहे. तसेच शिवसेनेलाही मोलाचा सल्ला दिला आहे. "सीमावाद प्रकरणी राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोषी आहेत. त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या सोबत जाण्यास तयार आहोत पण राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्यासोबत जाण्यापेक्षा एकटे लढू, भाजपासोबतही आम्ही जाणार नाही. आता अविकसित गावे शिवसेनेवर आरोप करण्याची शक्यता आहे. कारण ते राष्ट्रवादीचे नाकर्तेपण आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीचे शिंतोडे शिवसेना आपल्यावर का उडवून घेत आहे?" असे रोखठोक मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सगळ्याच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. कुणी बैठका घेतंय, तर कुणी मेळावे. विविध पक्षातील नेत्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. अलीकडेच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे एकाच व्यासपीठावर आले होते. ठाकरे-आंबेडकर या नेत्यांनी उघडपणे एकमेकांसोबत आले पाहिजे अशी विधाने केली. तेव्हापासून राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली होती. "आमची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेस-शिवसेना ठाकरे गटाला आम्ही युतीसाठी ऑफर दिली होती. परंतु अधिकृतरित्या दोन्ही पक्षांकडून आम्हाला अद्याप काहीही कळवण्यात आलं नाही. उद्धव ठाकरेंसोबत जो कार्यक्रम झाला तो अराजकीय होता. आम्हाला सोबत घ्यायचं की नाही ते त्यांनी ठरवावं," असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.